आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीबाबत आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची विधानपरिषदेत ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सविस्तर उत्तर*
महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता, त्यांच्या सुटकेसाठीच्या उपाययोजना आणि या जागतिक परिस्थितीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे काही देशांचे हवाई क्षेत्र बंद झाले असून दुबई, कुवेत आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तिथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन काय आहे तसेच युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतींचा सर्वसामान्य नागरिकांवर होणारा परिणाम रोखण्यासाठी शासन कोणती पावले उचलणार, यासंदर्भात आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी सरकारकडे माहिती मागितली.
या मुद्द्यांवर उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती सभागृहासमोर मांडली. युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांचे एअरस्पेस बंद झाल्याने नागरिकांच्या परतीत अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी राज्य सरकार परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासांच्या सातत्यपूर्ण संपर्कात असून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुटका मोहीम समन्वयाने राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच आपत्ती व्यवस्थापन व मदत-पुनर्वसन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्याकडे या मोहिमेची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली असून ते अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत असल्याची माहितीही मुख्यमंत्री यांनी दिली. प्रोटोकॉल विभागाच्या माध्यमातून भारतीय दूतावासांसोबत बैठका घेऊन आवश्यक Standard Operating Procedures (SOPs) निश्चित करण्यात आले आहेत.
आखाती देशांतील मराठी मंडळांना सक्रिय करून अडकलेल्या नागरिकांसाठी अन्न, निवारा आणि आवश्यक स्थानिक मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी आमदार श्री. मिहीर कोटेचा यांनी स्थानिक संपर्कांद्वारे भोजनाची व्यवस्था केल्याची माहितीही मुख्यमंत्री यांनी सभागृहात दिली. कुवेतमध्ये व्हिसा नसल्याने विमानतळाबाहेर पडू न शकणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय दूतावासाने निवास आणि भोजनाची व्यवस्था केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी विशेष व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून आवश्यक सूचना सोशल मीडियाद्वारे प्रसारित केल्या जात आहेत. तसेच देशात सध्या सुमारे दोन महिन्यांचा पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध असल्याने तात्काळ टंचाई किंवा दरवाढ होण्याची शक्यता नसल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. युद्धामुळे काही ठिकाणी अडकलेल्या शेतीमालाच्या निर्यातीच्या प्रश्नावरही राज्य सरकार लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी सांगितले की, “आखाती देशांमध्ये कार्यरत असलेले अनेक महाराष्ट्रातील नागरिक सध्या चिंतेच्या परिस्थितीत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि गरज भासल्यास त्यांना तातडीने मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच जागतिक परिस्थितीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होऊ नये यासाठी शासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”
आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या या मुद्द्यांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शासन सजग असल्याचे स्पष्ट झाले.
