वेंगुर्ला / शिरोडा: आठवी शिष्यवृत्तीचा निकाल काहीच दिवसांपूर्वी जाहीर झाला असून पू.गोगटे गुरुजी प्रतिष्ठान, आजगावच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मोफत शिष्यवृत्ती क्लासमधून कुमारी प्राची शंकर गवंडी प्रथम व कुमारी प्रांजल ज्ञानेश सावंत ही द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या गुणी विद्यार्थिनींचा गुणगौरव कार्यक्रम र.ग. खटखटे ग्रंथालय शिरोडा येथे पार पडला. यावेळी पू .गोगटे गुरुजी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री.विनय सौदागर, समन्वयक सचिन गावडे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रघुवीर उर्फ भाई मंत्री, आदी उपस्थित होते.
शिरोडा येथील र.ग. खटखटे ग्रंथालय येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी प्राची शंकर गवंडी व प्रांजल ज्ञानेश सावंत यांना प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येकी रोख एक हजार रुपये, ८ पुस्तके, किशोर मासिकाचे वर्षभराचे सदस्यत्व देण्यात आले. तसेच खटखटे ग्रंथालयाचे विनामूल्य सदस्यत्व बहाल करण्यात आले. दानशूर व्यक्तिमत्व भाई मंत्री यांचेकडून प्रथम क्रमांक प्राप्त प्राची गवंडी हिला रोख पाच हजार रुपये तर द्वितीय क्रमांक प्राप्त प्रांजल सावंत हिला रोख तीन हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
पू.गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मोफत शिकवणीमधून उद्याचे भविष्य घडत असून गावपातळीवर असा उपक्रम घेऊन श्री.विनय सौदागर हे गुणवंत विद्यार्थी घडवित असल्याने प्रतिष्ठानच्या कार्याचे आणि यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी कार्यक्रमात सरोज रेडकर, श्री.दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार श्री.अनिल निखार्गे, ग्रंथपाल, ग्रंथालय कर्मचारी, तसेच पू.गोगटे गुरुजी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
