*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम अभंग*
*अंतरीची वारी*
जप विठ्ठलाचा I असे अहोरात्र I
चैतन्यात गात्र I ईशावासे ! II १ II
करताना ऊरी I अंतरीची वारी I
रामकृष्णहरी I मुखी जप ! II २ II
दळता कांडता I ओवी अभंगात I
देव अंतरात I अहर्निश ! II ३ II
भावाची सुमने I श्रद्धेचं चंदन I
भक्तीत मंथन I सदोदित ! II ४ II
अंतरीची वारी I जरी नसे पायी I
ईश ठायी ठायी I मनांतरी ! II ५ II
नसे चंद्रभागा I नि पंढरपूर I
भावातीत सूर I अंतरंगी ! II ६ II
श्रद्धाभाव मनी I अंतरीची वारी I
भवाब्धीत तारी I भक्तांलागी ! II ७ II
*मानसी जामसंडेकर, गोवा*
