२३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान रजेवर; मागण्या न मानल्यास पुण्यात जमाबंदी आयुक्त कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’
सिंधुदुर्गनगरी :
महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन छेडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील सर्व कर्मचारी २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रजेवर जाऊन प्रशासनास असहकार करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासकीय कामकाज केले. मात्र शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कालबद्ध आराखड्यानंतरही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या आंदोलनाच्या काळात मोजणीसह सर्व शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार असून, कर्मचाऱ्यांनी आपले मोजणी साहित्य आधीच कार्यालय प्रमुखांकडे जमा केले आहे.
शासनाकडून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात सुधारित आकृतिबंध मंजूर करणे, मोजणी कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता निश्चित करणे, नियमबाह्य प्रतिनियुक्ती थांबवणे, खासगीकरणाचा निर्णय रद्द करणे तसेच ई-मोजणी सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर करणे, सुट्टीच्या दिवशी मोजणीच्या तारखा न ठेवणे आणि विभागाला तांत्रिक दर्जा देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एन. बी. रेडकर यांच्या नेतृत्वाखाली वाय. व्ही. नाईक, रोशनी मठकर, अमित देऊलकर आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यालय प्रमुखांना निवेदन सादर केले आहे
