*मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बजेटमधील आश्वासनाची अंमलबजावणी, तळागाळातील कर्मचाऱ्यांना भक्कम आधार*
पणजी :
गोव्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात सुधारणा करण्यात आली असून, महिला व बाल विकास संचालनालयाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. ही सुधारित संरचना १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.
हा आदेश २०२१ मधील पूर्वीच्या मानधन संरचनेची जागा घेत असून, अनुभवाधारित सुधारित प्रणाली लागू करण्यात आली आहे. राज्यपालांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या या आदेशाला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे.
ही सुधारणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा बजेट सत्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करणारी आहे. सरकारने हा निर्णय तातडीने लागू करून तळागाळातील कर्मचाऱ्यांप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.
नव्या संरचनेनुसार, अंगणवाडी सेविकांना यापूर्वी दरमहा ₹४,५०० (₹२,७०० केंद्र व ₹१,८०० राज्य वाटा) मानधन मिळत होते. आता गोवा सरकारकडून अतिरिक्त ₹१०,५०० पर्यंतचा वाटा देण्यात येणार असून, प्रारंभी एकूण मानधन ₹१५,००० इतके होईल, जे सेवेनुसार ₹२३,००० पर्यंत वाढेल.
त्याचप्रमाणे, अंगणवाडी मदतनीसांना यापूर्वी ₹२,२५० मानधन मिळत होते. आता अतिरिक्त ₹६,२५० राज्य वाटा मिळून त्यांचे मानधन ₹८,५०० पासून सुरू होऊन ₹११,५०० पर्यंत वाढेल.
हा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारच्या तळागाळातील कर्मचाऱ्यांच्या सन्मान, स्थैर्य आणि कल्याणासाठीच्या धोरणाचे प्रतीक मानला जात आहे.
हा आदेश महिला व बाल विकास संचालनालयाच्या संचालक तथा पदसिद्ध संयुक्त सचिव श्रीमती ज्योती देसाई यांनी जारी केला आहे.
