You are currently viewing देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेस प्रारंभ 

देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेस प्रारंभ 

इचलकरंजी: प्रतिनिधी

देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध खेळांचे दर्जेदार आयोजन इचलकरंजी मध्ये होत असून येथून पुढेही हॉकी च्या स्पर्धा नेहमीच व्हाव्यात. त्याचबरोबर देशभक्त बाबासाहेब खंजिरे हॉकी क्रीडांगण आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान व्हावे,ग्रास कोर्ट यासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव सादर करावा. शासकीय पातळीवर त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांचा राजकारण विरहीत खेळाचा वारसा राहुल खंजिरे समर्थपणे चालवत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. ते येथील देशभक्त बाबासाहेब खंजिरे हॉकी क्रीडांगणावर देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

पुढे बोलताना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजीत हॉकी खेळाचा प्रसार करणेकरिता महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब चे विजय पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. याकामी राहुल खंजिरे यांचे मोठे सहकार्य झाले असल्याचे सांगितले.

याप्रसंगी बोलताना जन्मशताब्दी समितीचे कार्याध्यक्ष राहूल खंजिरे यांनी जन्मशताब्दी समितीच्या वतीने घेत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मोबाईल मध्ये अडकलेल्या युवा पिढीस मैदानावरील खेळाकडे आकर्षित करणेसाठी या स्पर्धा मोलाची कामगिरी करतील अशी अपेक्षा असल्याचे सांगितले. देशभक्त बाबासाहेब खंजिरे हे स्वतः एक गुणवंत खेळाडू होते त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याची भावना व्यक्त केली. देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आजवर राष्ट्रीय एल्बो बॉक्सिंग,बुद्धिबळ,कबड्डी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे असे राहुल खंजिरे यांनी सांगितले.तत्पूर्वी देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान उद्घाटनाचा सामना महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर व फलटण हॉकी फलटण यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखत 2-0 गोल फरकाने सामना जिंकला. उद्घाटनाचा दुसरा सामना हनुमान ब्लेसिंग कोल्हापूर विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स गडहिंग्लज नूल यांच्या दरम्यान खेळविण्यात आला. हनुमान ब्लेसिंग कोल्हापूरच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाच्या बळावर सामना 4 विरुद्ध 1 अशा गोल फरकाने जिंकला.

स्पर्धेचे उद्घाटन व मैदान पूजन माजी आमदार सुरेश हाळवणकर, अनिल स्वामी- चेअरमन वीरशैव सहकारी बँक लि;कोल्हापूर, प्रदिप ठेंगल-अतिरिक्त आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका, अशोक स्वामी चेअरमन व्यंकटेश सह.सूतगिरणी, रवी रजपुते- माजी उपनगराध्यक्ष इचलकरंजी नगरपालिका, सौ. सुरेखा पाटील- अध्यक्ष हॉकी कोल्हापूर, मोहन भांडवले सचीव- हॉकी कोल्हापूर, अरुण खंजिरे, प्रकाश नवनाळे, विलास गाताडे, प्रकाश सातपुते, इस्माईल समडोळे, दत्ता माने, सदा मलाबादे, अरुण ललवाणी, अमित मेटे, जहांगीर पटेकरी, विजय पाटील, संतोष शेळके, अरुण मनोळे, उदय मेटे, अनिल बेलेकर, सुहास पाटील, नितिन डंबाळ, राजू बोरगावे यांसह मान्यवर उपस्थित होते. प्रस्तावित शामराव कुलकर्णी यांनी केले. आभार मिलिंद कांबळे यांनी मानले.

हॉकी खेळासाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र स्पोर्टस् क्लबचे वतीने हॉकी कोल्हापूर व हॉकी महाराष्ट्र, पुणे यांचे मान्यतेने दि. २४ ते २८ मे २०२३ अखेर राज्यस्तरीय निमंत्रीत पुरुष गट हॉकी स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे. ह्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर पोलिस संघासह जिल्हयातील सर्वोत्कृष्ट ५ संघ, सांगली, इस्लामपूर, सातारा, फलटण, हॉकी महाराष्ट, पुणे या व स्थानिक २ संघांसह १२ संघ सहभागी होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 2 =