४८ तासांच्या शोधानंतर वायंगणी किनाऱ्यावर मृतदेह आढळला; केरवाडी परिसरात शोककळा
वेंगुर्ले :
शिरोडा-केरवाडी समुद्रात रविवारी पहाटे होडी उलटून बेपत्ता झालेले खालची केरवाडी येथील मच्छीमार राजन राघोबा सारंग (वय ४६) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी तब्बल ४८ तासांनंतर वायंगणी समुद्रकिनारी तरंगताना आढळून आला. वायंगणी येथील कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली.
शिरोडा-केरवाडी येथील ५ ते ६ वाव खोल समुद्रात रविवारी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास ‘श्री देवी पावणाई प्रसन्न’ या होडीने प्रकाश राघोबा सारंग (५४), राघोबा प्रकाश सारंग (२१) आणि राजन राघोबा सारंग (४६) हे तिघे मच्छीमारीसाठी गेले होते. पहाटे ५ च्या सुमारास जाळे टाकत असतानाच अचानक सुसाट्याचा वादळी वारा आणि पाऊस सुरू झाला. समुद्रात उसळलेल्या प्रचंड लाटांचा तडाखा बसून त्यांची होडी उलटली आणि तिघेही पाण्यात फेकले गेले.
होडी उलटल्यानंतर राघोबा उर्फ दाजी सारंग याने प्रसंगावधान राखत पाण्यावर तरंगणारी २५ लिटर क्षमतेची प्लास्टिकची इंधन टाकी पकडली. काही क्षणात त्याचे वडील प्रकाश सारंग हेही पाण्याच्या वर आले, त्यांनाही राघोबाने या टाकीचा आधार दिला. यानंतर मदतीसाठी राघोबाने आरडाओरड करत कपड्याने इशारा केला. जवळच मच्छीमारी करत असलेले अनिल मसुरकर यांनी आपले जाळे समुद्रातच सोडून तातडीने होडी अपघातग्रस्त भागाकडे वळवली. मसुरकर यांच्या होडीवरील सहकाऱ्यांनी प्रकाश सारंग आणि राघोबा यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, मात्र राजन सारंग यांचा कुठेही पत्ता लागला नाही.
रविवारपासून स्थानिक मच्छीमार, किनारपट्टीवरील सागर सुरक्षा रक्षक, कोतवाल, पोलीस पाटील, कोस्टल पोलीस आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून राजन सारंग यांचा शोध घेतला जात होता. अखेर मंगळवारी पहाटे वायंगणी किनाऱ्यावर त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह किनाऱ्यावर आणला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे केरवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
