You are currently viewing करूळ घाटात भरधाव ट्रकचा थरार

करूळ घाटात भरधाव ट्रकचा थरार

करूळ घाटात भरधाव ट्रकचा थरार

दुचाकीस्वारासह दोन गाईंचा जागीच मृत्यू; सात वाहनांना धडक देत ट्रक दुकानात घुसला

वैभववाडी :

करूळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने गगनबावडा बसस्थानक चौकात भीषण साखळी अपघात घडवला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार तरुणासह दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला असून सात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अखिल रमजान थोडगे (वय २२, रा. गगनबावडा-कातळी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटातून वेगात येणाऱ्या ट्रकने प्रथम दुचाकीस्वार अखिल थोडगे याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चालक विजय बापू शिंदे याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक अनियंत्रित झाला.
अनियंत्रित ट्रकने पुढे चौकात उभ्या असलेल्या एका ट्रकला, मिनी ट्रॅव्हल्सला आणि एका कारला जोरदार धडक दिली. सुदैवाने त्या वाहनांमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, ट्रकचा वेग इतका प्रचंड होता की त्याने पुढे आणखी चार दुचाकींना चिरडले. या अपघातात दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला.
दरम्यान, रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन गाई ट्रकखाली आल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. अखेर हा भरधाव ट्रक एका दुकानात घुसून थांबला. या वेळी दुकानात उभी असलेली एक महिला किरकोळ जखमी झाली.
या भीषण साखळी अपघातात मिनी ट्रॅव्हल्स, कार, दुचाकी तसेच दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जखमींवर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गगनबावडा पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. डी. साळुंखे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा