You are currently viewing पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सावध राहा

पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सावध राहा

पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सावध राहा

महावितरणचे नागरिकांना आवाहन; आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी पावसाळा तसेच संभाव्य वादळ-वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणने कुडाळ उपविभागातील अधिकारी व लाईन स्टाफचे संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत.

वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे विजेच्या तारा तुटणे, वीज खांब वाकणे किंवा कोसळणे, रोहित्र पडणे तसेच वीजतारांवर झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाऊस सुरू असताना रोहित्र, वीज खांब किंवा वीजतारांखाली थांबणे टाळावे, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच तुटलेल्या विजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर, वितरण रोहित्र किंवा कोणत्याही विद्युत उपकरणांना चुकूनही स्पर्श करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

कोणत्याही भागात तातडीची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी त्वरित नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महावितरणचे २४ तास कार्यरत असलेले ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध असून नागरिक १९१२, १९१२०, १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात. जिल्हा संनियंत्रण समितीच्या कंट्रोल रूमसाठी ७८७५७६५०११ हा क्रमांकही जारी करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा