You are currently viewing सावंतवाडी एसटी स्थानकातले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम लोकप्रतिनिधींनी रोखले

सावंतवाडी एसटी स्थानकातले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम लोकप्रतिनिधींनी रोखले

सावंतवाडी

येथील बसस्थानकाच्या आवारात सुरू असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत आज सकाळी हे काम बंद पाडण्यात आले. यावेळी रिक्षा चालकांसह लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत एसटीच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. तसेच मलमपट्टी नको तर एकदाच डांबरीकरण करा, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी तात्पुरते हे काम केले जात आहे, असे सांगून आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र एकदाच काम करा, परंतु ते चांगले करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी संबधित अधिकार्‍यांकडे केली.

सावंतवाडी बसस्थानकाचा परिसर खड्डेमय बनला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे खडीचे दगड बाजूला असलेल्या रिक्षांवर बसून रिक्षांच्या काचा तुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्त्याचे काम आज अचानक हातात घेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी कोणतेही डांबर न घालता थेट खडी ओतण्याचा प्रकार सुरू होता. याबाबतची माहिती परिसरातील रिक्षा चालकांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिली. त्यानंतर सर्व पदाधिकार्‍यांनी त्या ठिकाणी धाव घेवून श्री. बोधे यांना धारेवर धरले. यावेळी हे तात्पुरते काम आहे. त्यानंतर डांबरीकरण केले जाईल, असे सांगून श्री. बोधे यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या श्री. साळगावकर यांच्यासह शब्बीर मणीयार, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, सुनिल नाईक आदींनी त्यांना धारेवर धरले. अशा प्रकारे चुकीचे काम करू नका, अन्यथा ते आम्ही होवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर एसटीच्या बांधकाम अधिकारी गिरीजा पाटील यांना त्या ठिकाणी बोलविण्यात आले. व हे काम योग्य पध्दतीने करा तसेच एकदाच डांबरीकरण करुन रस्ता वाहतूकीस योग्य बनवा, अशा सुचना यावेळी अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा