You are currently viewing आंबोली घाटमार्गे होणाऱ्या अवजड वाहतूक प्रकरणी मनसे “ऑन फिल्ड”

आंबोली घाटमार्गे होणाऱ्या अवजड वाहतूक प्रकरणी मनसे “ऑन फिल्ड”

सावंतवाडी

बुधवार दि 19 एप्रिल 2023 च्या रात्रीच्या अंधारात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंबोली चेकपोस्ट वर धडक देत घाटमार्गावर चाललेला कर्नाटक पासिंगच्या गाड्यांचा “रात्रीस खेळ चाले” उघडकीस आणून कारवाई करण्यास भाग पाडले. रात्री उशिरा पर्यंत मनसे पदाधिकारी प्रसाद गावडे, आशिष सुभेदार, अमोल जंगले, शुभम सावंत आदींनी चेक पोस्ट वर ठाण मांडत आंबोली घाटातील अवजड वाहतुकीसंदर्भात ऐरणीवर असलेल्या प्रश्नाला वाचा फोडली. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे महसूल, पोलीस व आरटीओ विभाग खडबडून जागा झाला आहे. ह्या प्रकरणामुळे चिरीमिरीच्या हव्यासापोटी आंबोली घाटमार्ग येत्या काळात धोक्यात आल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न समोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबोली घाट मार्ग हा अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन देखील या घाटमार्गावरून रात्रौच्या वेळेस कर्नाटक पासिंगचे ओव्हरलोड चिरे वाहतूक करणारे ट्रेलर दैनंदिन घाटमार्गे जात असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून व व्यावसायिकांकडून केल्या जात होत्या. न्यूज चॅनल व वृत्तपत्रांमध्ये तशा बातम्या देखील प्रसारित होत असल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी काल रात्री नऊच्या सुमारास आंबोली चेक पोस्टवर धडक देत कर्नाटक पासिंगच्या अवजड वाहतूक करणाऱ्या मल्टी एक्सल ट्रेलर्स वर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी काही गाड्या मागील तारखांचे पास वापरून चिरे वाहतूक करताना आढळून आल्या तर बहुतांश गाड्यांकडे दोन ब्रासचे पास असताना प्रत्यक्षात 800 ते 900 चीरे वाहतूक होत असल्याचे दिसून आले. याशिवाय कर्नाटक पासिंगच्या गाड्यांकडे जिल्ह्यात वाहतुकीसाठीचे टेम्पररी वाहतूक पास देखील नसल्याचे उघड झाले. एकूणच यामध्ये अवजड वाहतूक करून आंबोली घाटमार्ग धोक्यात आणला जात आहेत शिवाय जिल्ह्याचा महसूल देखील बुडवला जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी मनसेच्या धडक मोहिमेचे स्वागत केले असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा