You are currently viewing आसोली श्री नारायण विद्यामंदिर नंबर १ शाळेचा शतक महोत्सव

आसोली श्री नारायण विद्यामंदिर नंबर १ शाळेचा शतक महोत्सव

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नंबर १ या शाळेचा शतक महोत्सव १६ ते १८ मेपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शाळा शतक महोत्सव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सर्व पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग आणि देणगीदार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त गुरुवार १६ मे रोजी सकाळी ८ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वा. शाळा प्रवेशद्वाराचे उद्घाटन, पाककला दालनाचे उद्घाटन, दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन व शतक महोत्सवाचे उद्घाटन, शाळेच्या माजी शिक्षकांचा सत्कार व मान्यवरांची मनोगते होणार आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपकभाई केसरकर, प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, विशाल फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, निवृत्त बँक अधिकारी राजेश नाडकर्णी, आसोलीचे सरपंच बाळा जाधव, उपसरपंच संकेत धुरी आदी उपस्थित राहणार आहेत. संध्या. ६ ते ७ वाजेपर्यंत राजेश नाडकर्णी यांचे गायन, संध्या. ७ वा. शालेय आजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

शुक्रवार दि. १७ मे रोजी ९ वा. दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन व इतर कार्यक्रमांसह पारितोषिक वितरण समारंभ, मान्यवरांची मनोगते होणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शंकरभाई कांबळी, सन्मानीय पाहुणे म्हणून मुंबईतील उद्योजक उदय आसोलकर, उद्योजक महादेव आंदुर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, सचिन दळवी, विष्णुदास कुबल आणि माजी सभापती सुनील मोरजकर आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्या. ७ वा. महिला व माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि महा पैठणीचा खेळ होणार आहे. निवेदन शुभम धुरी करणार आहेत.

शनिवार दि. १८ मे रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, ११ वा. आरती, तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, संध्या. ४ वा. महिलावर्गाचे हळदीकुंकू, संध्या. ६ वा. आसोली ग्रामस्थांची भजने व रात्री १० वा. आसोली नारायणाश्रीत नाट्यमंडळाचा ‘पांडगो इलो रे बा इलो’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा