उद्धव ठाकरे साहेब, हे वैभव नाईक कोकणातून २१ आमदार निवडून आणत असतील तर आजच त्यांना मुख्यमंत्री करून टाका….

उद्धव ठाकरे साहेब, हे वैभव नाईक कोकणातून २१ आमदार निवडून आणत असतील तर आजच त्यांना मुख्यमंत्री करून टाका….

– बाबा मोंडकर यांचा थेट उद्धव ठाकरेंनाच सल्ला

कोकणातून शिवसेनेचे अकरा उमेदवार काही पुन्हा निवडून येत नाहीत असे खासदार नारायणराव राणे यांनी सांगितल्याबरोबर सुशेगाद असलेले आमदार वैभव नाईक खडबडून जागे झाले. राणेसाहेबांवरील टीका आणि मंत्रिपद यांची गणिते घालायला सुरुवात करत त्यांनी राणेसाहेबांवर टीका करत असतानाच कोकणातून २१ आमदार निवडून आणण्याची वल्गना मारे राणा भीमदेवी थाटात केली. हा एकवीसचा आकडा कुठून काढला याचा विचार करताना लक्षात आले की आज संकष्टी चतुर्थी असल्याने दिवसभर मोदक डोळ्यासमोर तरळत असल्यानेच हा आकडा तोंडातून आला असणार. अन्यथा कालच्या निवडणूकीत फक्त आठ दिवसांची तयारी करत रिंगणात उतरलेल्या रणजित देसाई यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराने पाच वर्षे सत्ता भोगलेल्या या आमदारांचा कसा पळवून पळवून धूर काढला हे कोकणच्या जनतेने जवळून पाहिले आहे. पन्नास हजाराच्या आघाडीच्या बाता करणाऱ्या या आमदाराना पंधरा हजारांची पण आघाडी घेता आली नव्हती हे त्यांनी विसरू नये आणि त्यानंतर २१ आमदारांचे आश्वासन मातोश्रीला द्यावे. राणेंचा पराभव करण्यात तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा भाग किती होता हे तुम्हाला स्वतःलाही माहीत आहे. आता भूतकाळाचा नव्हे, तर भविष्यकाळाचा विचार करताना मागच्या दहा वर्षात पुलाखालून कितीतरी पाणी वाहून गेले आहे याचे भान ठेवा. तुमचे सरसेनापती उद्धव ठाकरे यांनी राणेद्वेषातुन युतीचा मान न राखता स्वतःच्या उमेदवाराला पक्षचिन्ह देत स्वतःही गडनदीच्या काठावर छावणी मांडली होती. पण आमदार वैभव नाईक ज्या कणकवलीत राहतात, त्या कणकवलीच्या मतदारांनी या सगळ्यांना धोबीपछाड देत भाजपाच्या चिन्हावर नितेश राणेंना तुमच्या दुप्पट मताधिक्याने निवडून आणले होते, हे तुम्ही विसरलात तरी तुमचे कणकवलीत पानिपत झालेले सरसेनापती ठाकरे अद्याप विसरलेले नाहीत. दिशाभूल करत कणकवलीत त्यांना कात्रजचा घाट दाखवल्यानेच त्यांनी तुम्हाला मंत्रिपदापासून वंचित ठेवले आहे. आता एकवीस आमदारांचा नैवेद्य सोडलात तरी तुम्हाला मंत्रपद मिळणार नाही हे पक्के मनावर बिंबवा आणि त्यापायी रानेद्वेषाचे तुणतुणे वाजवायचे आता सोडून द्या. घोडामैदान जवळच आहे, काय होणार ते लवकरच कळेल. त्याआधी पराभव पराभव अशी अखंड प्रार्थना केलात, तर परमेश्वर ती लवकरच नजीकच्या काळातदेखील पूर्ण करू शकतो, नाही असे नाही. त्यासाठीच आता त्यांनी सज्ज रहावे. राणे आणि भाजपा या समिकरणाची ताकद शिवसेनेला येत्या काळात नक्कीच समजेल. जर एकवीस आमदार देण्याचे प्रतिज्ञापत्र आमदार वैभव नाईक मातोश्रीच्या चरणावर करून देत असतील, तर उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्री न करता थेट आजच मुख्यमंत्री करून टाकावे. तसेही आपला कारभार पाहता त्यामुळे फार काही तोटा होईल असेही वाटत नाही, आणि एवढा थोर चमत्कारी बाबा तुम्हाला पुन्हा शोधूनही सापडणार नाही. तेव्हा तसाही विचार करायला हरकत नाही. फक्त, तोपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी फक्त थोडीशी सबुरी ठेवावी आणि आपल्या पायावर राणेंवरील टीकेची कुऱ्हाड मारून घ्यायची एवढी घाई करू नये, एवढाच सल्ला आजच्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने देतो, असे भाजपा प्रवक्ते बाबा मोंडकर म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा