You are currently viewing करोना काळात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्याबद्दल प्रशांत दामले यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान…..

करोना काळात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्याबद्दल प्रशांत दामले यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान…..

दिग्दर्शकनिर्माते सुभाष घई यांसह 45 करोना योद्ध्यांचा केला सन्मान

 मुंबई

करोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

            निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांसह समाजाच्या विविध क्षेत्रात करोना काळात असामान्य कार्य करणाऱ्या करोना योद्ध्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            अनादी काळापासून आपल्या देशातील लोकांमध्ये समाजसेवेची आवड आहे. जनसेवा ही ईशसेवा मानली गेली आहे. समाजाला देणे ही संस्कृती लोकांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. त्यामुळे करोना काळात समाजासाठी काम करण्याची अहिमहीका बघायला मिळाली, असे यावेळी राज्यपालांनी सांगितले.

            कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. समाजातील प्रत्येक घटकाचे कार्य सारखेच महत्वाचे असते. करोना देशातून लगेचच जाण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे यापुढेही करोना योद्ध्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सेवाकार्य सुरु ठेवावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केली.

 विविध इस्पितळांमधील डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉईज, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स  पुरविणाऱ्या दानशूर व्यक्ती अशा 45 करोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला.

            भाभा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रदीप जाधव, परिचारिका दिपाली इंदुलकर, सफाई कर्मचारी उदयकुमारी चरमर, जसलोक रुग्णालय येथील परिचारिका सोनल घुमे, आरोग्य सेविका लतिका नकते, फादर कॉसमॉस एक्का, होली स्पिरीट इस्पितळाच्या कार्यकारी संचालिका स्नेहा जोसेफ, ट्राफिक वार्डन अनिता लोबो, वैद्यकीय अधिकारी संजय फुंदे, वार्ड अधिकारी सुरेंद्र सिंग, संदीप मुर्जानी व देवयानी वैद्य, जैन संघटनेचे संजय दोषी, रेडीओलॉजिस्ट डॉ पूजा राजेश छेडा, किशोर मन्याल, महावीर हॉस्पिटलचे प्रकाश कोठारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + fifteen =