You are currently viewing रांगोळीचा बादशाह

रांगोळीचा बादशाह

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी विलास कुलकर्णी यांचा “रांगोळीचा बादशाह” शैलेश कुलकर्णी यांच्यावर लिहिलेला लेख*

 

*रांगोळीचा बादशाह* :

*शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी*.

 

नावातच भगवान शंकर, कला अंगी असणारच!

जळगाव जिल्ह्यापासून

हाकेच्या अंतरावर असलेल्या जारगाव या छोट्याशा खेड्यागावातून आलेला ,कोणत्याही प्रकारचा कलेचा वारसा नसणारे हे गाव.घरात देखील कोणताही कलेचा वारसा नव्हताच. वडीलांची नोकरी बी. एस. एन. एल. मध्ये तर आई गृहिणी.

शालेय शिक्षण गावी प्राथमिक शाळेतच झाले. तशी लहानपणापासूनच कलेची आवड होती, मात्र खरी कलाटणी मिळाली ती शालेय शिक्षक डी. आर. कोळी सरांमुळे. त्यांनी शैलेश मधील खरी गुणवत्ता ओळखून कलेला प्रोत्साहन दिले. सकाळ वर्तमानपत्राचे बालचित्र कला स्पर्धेतील तालुका पातळीवरील मिळालेले उत्तेजनार्थ बक्षीस याच काळामधील. ते आयुष्यात मिळालेले पहिले बक्षीस रु. २५ मात्र शैलेशने अजूनही तसेच जपून ठेवले आहे.

करिअर करायचे तर कलेमध्येच असे आधीपासूनच ठरवले होते. त्याच काळात जे. जे. मध्ये शिकण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो सतत काम करत राहिला आणि सन २०१६ मध्ये ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले व राज्यात ११ व्या क्रमांकाने सीईटी मध्ये उत्तीर्ण होऊन जे. जे. मध्ये प्रवेश झाला.

त्याच दरम्यान विविध चित्र स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षीसे ही त्याने मिळविली. ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ यांच्या वार्षिक कला प्रदर्शनासाठी, देशातील मोजक्या चित्रकारांमध्ये शैलेशच्या चित्रकृतीची सन २०१७-१८ , २०१८-१९ या सलग दोन वर्षी देशपातळीवर निवड झाली. याच काळात अनेक रांगोळी कलाकारांशी संबंध आला आणि ते

कौशल्य पाहून तो रांगोळीकडे आकर्षित झाला. सांगायचं झालंच तर कोणाकडूनही रांगोळी कलेचे पारंपरिक शिक्षण घेतले नाही, स्वतःच्या अनुभवातूनच या कलेला आत्मसात करण्याचा त्याने प्रयत्न केला.

मुंबई विद्यापीठाच्या ‘युथ फेस्टिवल २०१८ – १९’ मध्ये त्याने रांगोळी प्रकारात महाविद्यालयाला ‘रौप्य पदक’ मिळवून दिले. त्यानंतर ‘सुवासिनी’, ‘बेभान ‘, ‘भीमरूपी ‘ या शीर्षकांखाली रेखाटलेल्या त्याच्या रांगोळ्यांना कलारसिकांनी अगदीच भरभरून प्रतिसाद व भरपूर प्रेम दिले. सन २०१९-२० मध्ये गणेशोत्सवा दरम्यान पहिले रांगोळी प्रदर्शन त्याच्याच गावात ‘कलाछंद आर्ट अकादमी ‘ तर्फे भरविले गेले. अतिशय मोठ्या आकाराच्या

रांगोळ्या रेखाटण्या मध्येही तो सहभागी होऊ लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर इ.थोर व्यक्तींच्या रांगोळी कलाकृती साकारण्याचे भाग्य त्याला लाभले. तसेच गोवा, मध्यप्रदेश इ. राज्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष रांगोळी साकारण्याची संधी त्याला मिळाली. नुकतेच कोरोना विषयी सामाजिक जनजागृती पर रांगोळी काही सहकाऱ्यांबरोबर ‘कलाछंद आर्ट अकादमी’ तर्फे त्याने सादर केली. भविष्यात मोठा चित्रकार व रांगोळीकार होऊन ग्रामीण भागात कलेला बहर आणण्याचा त्याचा मानस आहे.

रांगोळी अशी कला आहे जी काढली गेल्यानंतर काही वेळच आपल्या समोर सादर होऊ शकते, कायम स्वरूपी ती टिकून राहू शकत नाही, असे असतांना देखील हा कलाकार जीव ओतून ती रांगोळी साकारत असतो, ते कालांतराने नाहिसे होण्याचे भानही त्याला नसते. असाच अनुभव सांगायचा झालाच तर, एकदा भाच्याच्या वाढदिवसानिमित्त रात्रभर बसून रांगोळी साकारली व सकाळी ती सर्वांना बघण्यासाठी म्हणून ठेवली. एका सद्गृहस्थाला तो फोटो असल्याचे वाटून त्याने तो सरळ केला, मात्र तो फोटो नसून ती रांगोळी होती आणि मग क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले व ती रांगोळी पुसली गेली. तसेच मागील वर्षी नवरात्रोत्सवादरम्यान शिंदाड या गावी आपल्या सहकार्यांसह, ‘ दुर्गा मातेची’ भव्य स्वरूपातील १३-२० फुट या आकाराची रांगोळी रेखाटली होती. रांगोळी रेखाटत असतांना गावातील काही वयोवृद्ध महिला त्या ठिकाणी आल्या व रांगोळी बघून त्या आश्चर्यचकीत झाल्या व त्याच्या कडे येऊन त्याला म्हणाल्या, आम्ही तुला नमस्कार करतो, तू आमच्यासाठी कलेतील देवच आहेस. पण त्याने त्यांना वंदन करून मलाच आशीर्वाद द्या असे तो त्यांना म्हणाला. अशा कला रसिकांमुळेच त्याच्या सारख्या कलाकारांना नवचैतन्य मिळत असते. अशा अनेक आठवणी, अनुभव नवीन काहीतरी करायला त्याला चालना देत असते.

3डी रांगोळी , अनोमॉर्फिक रांगोळी , पोस्टर रांगोळी इत्यादी प्रकारातील रांगोळी तो लीलया साकारतो. अनेक वृत्तपत्र, सोशल मीडिया तसेच टि. व्ही. चॅनेल्स यांनी त्याच्या कलेची आवर्जून दखल घेतली आहे. त्याच्यावरील सर्वांचे आशिर्वाद व प्रेम असेच कायम राहो ही विनंती.

 

शैलेश पेन्सिल व ऑईल पेंट मध्ये कुणाचेही हुबेहूब चित्र रेखाटून देतो . कुणाला आपले स्वतःचे वा कुटुंबाचे रेखाचित्र काढून हवे असेल कोणत्याही समारंभासाठी रांगोळी काढून हवी असेल तर त्याच्याशी जरूर संपर्क साधावा .

सध्या जगभर गाजत असलेल्या कलाकारांचा व्हॉट्सॲप समुह ‘ *जागतिक* *साहित्य* *कला* *व्यक्तीत्व* *विकास मंच* ‘ या समूहात तो सामील झाला आहे.

 

त्याच्या पुढील वाटचाली साठी जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच समुह अध्यक्ष श्री.पांडुरंग कुलकर्णी व जनसंपर्क अधिकारी श्री विलास कुलकर्णी यांच्या कडून हार्दिक शुभेच्छा.

 

कुणाला स्वतःची कुटुंबाची व्यक्ती चित्रे रांगोळ्या रेखाटून हव्या असतील तर त्याला जरूर जरूर कळवा.

त्याचा नंबर खाली देत आहे.

*शैलेश कुलकर्णी* *पाचोरा जिल्हा. जळगाव*

*8446932849*

 

शब्दांकन :

विलास कुलकर्णी

मीरा रोड

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा