You are currently viewing आईसीसीने भारताच्या विश्वचषक विजयाचा १२ वा वर्धापन दिन केला खास

आईसीसीने भारताच्या विश्वचषक विजयाचा १२ वा वर्धापन दिन केला खास

*विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या बोधचिन्हाचे केले अनावरण*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारतीय क्रिकेट संघाने २०११ मध्ये विश्वचषक जिंकून १२ वर्षे पूर्ण केली. २ एप्रिल २०११ रोजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयी षटकार मारून टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आईसीसी) टीम इंडियाच्या विजयाचा वर्धापन दिन खास बनवला आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचा अधिकृत लोगो जारी केला.

आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोगोचा फोटो शेअर केला आहे. क्रिकेट विश्वचषक ‘नवरस’ म्हणून विकसित करण्यात आला आहे. स्पर्धेच्या सामन्यांदरम्यान चाहत्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी विविध रंगांचा वापर करण्यात आला आहे. नवरसामध्ये आनंद, सामर्थ्य, दुःख, सन्मान, अभिमान, शौर्य, गौरव, आश्चर्य आणि उत्कटता या भावनांचा समावेश होतो. या भावना विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान पाहायला मिळतात.

*भारत स्पर्धेच्या यजमानपदासाठी सज्ज: जय शाह*

यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी विश्वचषक विजयाच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाला, “टीम इंडियाने प्रदीर्घ कालावधीनंतर विश्वचषक जिंकला होता. आम्हाला आशा आहे की यावेळी या स्पर्धेत अनेक नवीन आठवणी जोडल्या जातील. बीसीसीआय विश्वचषकाचे आयोजन करण्यासोबतच, भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांसाठी स्मरणात राहण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यास आम्ही उत्सुक आणि सज्ज आहोत.

*घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते: रोहित शर्मा*

त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आगामी विश्वचषकाबाबत आपले विचार व्यक्त केले. तो म्हणाला, “आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ ला अजून सहा महिने बाकी आहेत, पण उत्साह आधीच आहे. आपल्या घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. एक कर्णधार म्हणून मी त्याची वाट पाहत आहे. आम्ही स्पर्धेत सर्वकाही देऊ. पुढील काही महिन्यांतील तयारीमुळे आम्हांला विश्वचषक उंचावण्याची संधी मिळू शकते.

*विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते*

विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाऊ शकतो. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेतेपदाचा सामना खेळला जाऊ शकतो, जे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम देखील आहे.

जानकारांच्या मते, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ह्या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी किमान डझनभर ठिकाणे निवडली आहेत, ज्यात मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर आणि राजकोट या शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेत ४६ दिवसांत एकूण ४८ सामने होतील. तथापि, बीसीसीआयने अद्याप सामन्यांसाठी कोणतेही विशिष्ट ठिकाण किंवा सराव सामन्यांसाठी शहरे जाहीर केलेली नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा