You are currently viewing माझ्या भाषेची समृद्धी

माझ्या भाषेची समृद्धी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*माझ्या भाषेची समृद्धी*

माझ्या मराठीचा गंध दशदिशात दाटला
चोखा तुका ज्ञानेशाने साऱ्या जगात वाटला

बोट धरून भटांचे येते गझल अंगणी
पायी घुंगरू बांधून मस्त नाचते लावणी

समरसून ऐकावे शाहिरांचे ते पोवाडे
आयुष्याला दिशा देती एकनाथांची भारुडे

पूर्वसुरींनी आम्हाला आर्या ऋचा शिकविल्या
गण वृत्ते नी सवाया आम्हापुढती ठेवल्या

त्यांचा घेऊन आधार होते लेखणी समृद्ध
किती कवींच्या कल्पना तेव्हा होती शब्दबद्ध

भजन नी कीर्तनात भावभक्तिचे तरंग
जात्यावरल्या ओव्यांनी मोकलले अंतरंग

हळू चुकतमाकत भाषा बोललो बोबडी
काळ्या पाटीवर रेघा गिरवली बाराखडी

माझ्या मराठीचा ताल माझ्या मराठीच सुर
माझ्या मराठीची लय अति मधुर मधुर

जनी नाम्या चे अभंग मुखामध्ये घोळवूया
सन्मानाने मराठीची दिंडी घेऊन चालूया

आंग्ल भाषेची ठिगळे नका मराठीला लावू
शुद्ध स्पष्ट मराठीचा वसा पुढे पुढे नेऊन,

माय मराठी ही माझी माझ्या भाषेचा गोडवा
सारस्वतांनो रे तुम्ही तिन्ही लोकांत पोचवा

जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक 98 90 25 89 77

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =