You are currently viewing शिरोडा वेळाघर येथे होणार ताज ग्रुपचे पंचतारांकित हॉटेल…

शिरोडा वेळाघर येथे होणार ताज ग्रुपचे पंचतारांकित हॉटेल…

माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश…

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा गोव्याच्या सीमेला लागून असलेला, निसर्गाचा वरदहस्त असलेला, हिरवळीने नटलेला, पांढरा शुभ्र सागरकिनारा लाभलेला निसर्गसंपन्न जिल्हा. साधीभोळी प्रेमळ माणसे आणि ग्रामीण संस्कृती ओतप्रोत भरलेला हा जिल्हा कित्येकवर्षं विकासापासून दूर राहिला. युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला, आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या नकाशावर आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यापेक्षाही सुंदर समुद्रकिनारे लाभलेले आहेत, त्यामुळेच पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यावर सिंधुदुर्गालाही गोव्याप्रमाणेच पर्यटनाचे वेध लागले होते. महाराष्ट्र सरकार कडून पर्यटन निधी जिल्ह्यात येऊ लागला, युती शासनाचे पर्यटन महोत्सव होऊ लागले होते. परंतु सरकार बदलले आणि पर्यटन महोत्सव बंद झाले.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा व्हावा ही संकल्पना तत्कालीन खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि दीपक केसरकर यांची होती. सुधीर सावंत यांनी वेळाघर येथे तंबू निवास उभारून पर्यटनाला चालना दिली होती. तसेच पर्यटन संस्था काढून पर्यटन विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. शासनाचे महोत्सव बंद झाल्यावर सावंतवाडीचे नगराध्यक्ष असताना दीपक केसरकर यांनी सावंतवाडी महोत्सव भरविण्यास सुरुवात केली जो आजपर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे त्या कालावधीत पर्यटक आकर्षिले जाऊ लागले. नारायण राणे यांनीही भव्यदिव्य सिंधू महोत्सव भरविले होते.

युती शासनाच्याच काळात वेळाघर येथे ताज ग्रुप च्या पंचतारांकित हॉटेलसाठी जागा आरक्षित करण्यात आली, परंतु त्याला स्थानिक शेतकऱ्यांकडून कडवा विरोध झाला, त्यामुळे वेळाघर येथे होऊ घातलेला ताज ग्रुप चा प्रकल्प कागदावरच राहिला होता. पर्यटनाबाबत विशेष प्रेम असणारे, विकासाची, रोजगाराची दूरदृष्टी असलेले दीपक केसरकर यांचा वेळाघर येथील ताज ग्रुपच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. हा प्रकल्प यावा, स्थानिकांना रोजगार मिळावा, पर्यटक आल्याने बाजारपेठेला चांगले दिवस येतील, व्यापार वाढेल अशी केसरकर यांची दूरदृष्टी होती. पर्यटन प्रकल्पना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी तिलारी धरणाचे पाणी लिफ्ट करून मालवण पर्यंत नेण्यासाठी त्यांनी योजनाही मंजूर करून आणली होती. परंतु निधी अभावी काम रखडले.
पुन्हा एकदा युती शासनातील मुख्य घटक पक्ष शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे रखडलेल्या ताज ग्रुपच्या या प्रकल्पाला माजी राज्यमंत्री दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याने पुन्हा एकदा ऊर्जितावस्था आली. मध्यंतरी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही वेळाघर येथे भेट दिली होती. त्यामुळेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि ताज ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला व पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प लवकरच वेळाघर येथे सुरू होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + twelve =