You are currently viewing “शेतकरी ते थेट गिऱ्हाईक” असे भासवत पराजिल्ह्यातील विक्रेत्यांकडून केमिकलयुक्त फळ विक्री.

“शेतकरी ते थेट गिऱ्हाईक” असे भासवत पराजिल्ह्यातील विक्रेत्यांकडून केमिकलयुक्त फळ विक्री.

जिल्ह्यातील परप्रांतीय व्यापारी देखील दुकाने थाटून हाच उद्योग करतात.

संपादकीय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणारे अनेक व्यापारी हे तेथील घाऊक व्यापाऱ्यांकडून कमी दरात सर्वच प्रकारची अर्धी पिकलेली, कच्ची फळे विकत घेतात आणि सिंधुदुर्गातील अनेक शहरामध्ये शहरांच्या बाहेरील नाक्यांवर आपल्या गाड्या भरून फळविक्री करतात. कच्ची फळे आणल्याने ती लवकर खराब होत नाहीत आणि जिथे गाडी लावतात तिथेच कार्बाईड मिश्रित पाण्यात बुडवून फळे पिकवतात आणि अशी केमिकलयुक्त फळे जिल्ह्यातील भोळ्या नागरिकांच्या माथी मारतात. परजिल्ह्यातून शेतकरी ते थेट ग्राहक म्हणजे मधले दलाल नाहीत या भाबड्या समाजापोटी आपले कोकणी लोक अशा ताज्या भेटणाऱ्या फळांकडे आकर्षित होतात आणि खरेदी करून स्वतःची फसवणूक करून घेतात.


कुडाळ शहरात बुधवारच्या बाजाराला परजिल्ह्यातून गाड्या घेऊन फळे विकणाऱ्या एका टोळीला व्यापारी संघटनेने व कुडाळ मधील जागरूक नागरीकांनी रंगेहाथ पकडले. ते कार्बाईडच्या पाण्यात फळे टाकून पिकवत होते. अशाप्रकारे अजूनही काही गाड्या कुडाळ मध्ये आल्या होत्या पण व्यापारी संघटना व कुडाळ शहरातील जागरूक नागरीकांचा पवित्रा लक्षात घेवून त्यांनी गाड्यांसहित पळ काढला. मात्र एक कार्बाइडने पिकविलेल्या फळांची भरलेली गाडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली. या फळ विक्रेत्यांना त्यांच्याकडील केमिकल बाबत विचारल्यावर त्यांनी फळे पिकविण्यासाठी ते वापरत असून सांगली येथील मार्केटमधून फळे आणल्याचे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार रस्तोरस्ती गाड्या लावून, तात्पुरती दुकाने उभारून फळ विक्री करणारे हे लोक शेतकरी नसून घाऊक मार्केटमधीलच फळे आणून केमिकल वापरून पिकवून जिल्हावासीयांची फसवणूक करणारे भामटे असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात कुडाळ येथेच नव्हे तर सावंतवाडी, कणकवलीत देखील बाजारपेठेत अनेक परप्रांतीय फळ विक्रेते वर्षानुवर्षे फळ विक्री करतात. यातील बरेचसे कायमस्वरूपी फळ विक्रीची दुकाने थाटलेले फळ विक्रेते देखील कार्बाईड मध्ये फळे पिकवून आणतात. या फळ विक्रेत्यांकडून घेतलेली केळी वरून चकचकीत तर आतून काळे डाग असतात आणि घरी नेताच देठापासून गळून पडतात. त्यामुळे शहरातील फळ विक्रेते देखील नैसर्गिकरित्या पिकलेली फळे विकणारे संत नाहीत. परंतु बाहेरून आलेले विक्रेते फळ पिकवताना पकडले गेल्याने चोर आणि बाजारपेठेतील बरेचसे फळ विक्रेते आपल्या गोदामात फळ पिकवतात म्हणून साव ठरतात.
फळे खा आणि सुदृढ, निरोगी रहा असं म्हणतानाच केमिकलयुक्त लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक फळे खाल्ल्याने सुदृढ आरोग्य मिळण्यापेक्षा माणसांचे शरीर रोगी बनत चालले आहे. शहरात अशाप्रकारे कार्बाईड वापरून फळ पिकवून विकणाऱ्या विक्रेत्यांची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात यावी आणि केमिकलयुक्त फळ विक्रेत्यांना फळ विक्रीस मज्जाव करण्यात यावा अशी मागणी लोकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 3 =