You are currently viewing 2023 वर्षामध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करु या – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

2023 वर्षामध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करु या – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

33 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे उद्घाटन संपन्न

 

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 33 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे उद्घाटन आज झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनीवार आदी उपस्थित होते.

अपघातामध्ये आपले जवळचे नातेवाईक जखमी झाले किंवा दगावले तरच आपल्याला अपघाताची गंभीरता कळते. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करणे प्रत्येकांची जबाबदारी आहे. 2023 वर्षामध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.

तसेच जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा वार्षिक योजना यांच्या विकास निधी मध्ये रस्ते विकासाला जास्तीत जास्त निधी दिला जातो. प्रशासनाकडून रस्ते विकासाची कामे करताना त्याचा दर्जा चांगला होईल यावर भर दिला पाहिजे. रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना शिस्त असावी, यासाठी प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. त्याबरोबर वाहनचालकांनीही सुरक्षितपणे व जबाबदारीने वाहन चालविण्याबरोबरच सुरक्षा नियमांचे पालन करायला हवे.

जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 100 युवकांना आपदा मित्रचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.आणखी 150 युवकांना आपदा मित्रचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या आपदा मित्रांना अपघात घडल्यानंतर तातडीने मदत कशी करावी, याबाबत प्रशिक्षित करण्यात येते.तरी जिल्ह्यातील युवकांनी या प्रशिक्षिणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल यावेळी म्हणाले, आपल्या देशात जगाच्या 1 टक्के इतकी वाहने असून जगाच्या 13 टक्के इतके रस्ते आहेत. देशामध्ये प्रत्येक मिनीटाला एका अपघाताचे प्रमाण आहे. तर अपघातामुळे प्रत्येक 4 मिनिटात एका व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागतो. अपघातामध्ये महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण 53 टक्के इतके आहे. अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे, वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवणे या बरोबर सुरक्षित वाहन चालविणे आवश्यक आहे. पोलीस विभाग वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतो. ती त्यांच्या सुधारणेसाठी असते. अपघात घडल्यास मदतीसाठी शासकीय यंत्रणा पोहचत असतेच तथापि, जवळ असणाऱ्या लोकांनीही तातडीने मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर म्हणाले, महामार्गालगत व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी दुभाजक काढणे, अतिक्रमण करणे असे प्रकार करत असतात हे करु नये. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे. चुकीच्या मार्गाने वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करुन नये. ज्या ठिकाणी अपघात घडेल त्यावेळी जवळ असणाऱ्या व्यक्तींना तातडीने मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. जिल्ह्यामध्ये 2 लाख 72 हजार 571 इतकी सध्या नोंदणीकृत वाहने आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 486 अपघात झाले असून यामध्ये 285 गंभीर अपघात आहेत. यामध्ये 187 जणांनी आपले प्राण गमावले असल्याचे सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनीवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.

जिल्ह्यात पहिल्या महिला रिक्षा चालक हेमलता राऊत, विना अपघात सेवा बजावलेले एस.टीचे चालक मधुकर मुंज, सुनिल पार्टे, रविंद्र सावंत, संतोष डिचवलकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अविनाश वालवलकर यांनी केले. आभार सुनिल खंदारे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =