You are currently viewing टेंडर रूटस् संस्थेने दशावतारी कलाकारांना पुरविली जीवनावश्यक साहीत्याची किट

टेंडर रूटस् संस्थेने दशावतारी कलाकारांना पुरविली जीवनावश्यक साहीत्याची किट

खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या हस्ते किटचे वाटप

अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी (सिंधुदुर्ग) ने टेंडर रूटस् या संस्थेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले होते. टेंडर रूटस् संस्थेने या आवाहनाला प्रतिसाद देत दशावतारी कलाकारांना जीवनावश्यक साहीत्याची किट उपलब्ध करून दिली. मंगळवारी कुडाळ येथे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दशावतारी कलाकारांना या किटचे वाटप करण्यात आले.

कुडाळ पंचायत समिती येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, उपसभापती जयभारत पालव, महिला आघाडी जिल्हा संघटक सौ.जान्हवी सावंत, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, जि.प.चे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, पं.स.सदस्य मिलिंद नाईक, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमीचे अध्यक्ष बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे, प्रकाश तांबे, राजा सामंत, बबन बोभाटे, आनंद भोगले आदींसह अकादमीचे पदाधिकारी व जिल्ह्यातील दशावतारी कलाकार उपस्थित होते.
याप्रसंगी  खा.विनायक राऊत म्हणाले, कोरोना महामारी कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विविध लोककला जोपासण्याचे मोठे कार्य लोककलाकारांनी केले. कलावंत हा कलावंतच असला पाहिजे. कला हे वैभव आहे. ते टिकवण्याचे काम कोकणातील सर्वच लोककलावंत करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात दशावतारी कलाकार कठीण परिस्थितीत असतानाही ऑनलाइन दशावतारी कलेच्या माध्यमातून कला सादर करण्यात आली, त्यामुळे या कलेला उर्जितावस्था मिळाली. सर्वांना अभिमान वाटावा अशा पद्धतीने दशावतारी कलाकार ही कला सादर करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. यापुढे कलाकारांनी एकसंघ राहावे आणि हि कला अधिक वृद्धींगत करावी. त्यासाठी शासनाचे जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी आम्ही निश्चितच सर्वतोपरी सहकार्य करू. तसेच राज्य शासनाने कलाकारांसाठी जाहीर केलेल्या मदत वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही खा. राऊत यांनी यावेळी दिली.
आमदार वैभव नाईक म्हणाले, कोरोनाच्या काळात कठीण परिस्थितीतही दशावतारी कला अखंडितपणे जोपासण्याचे काम दशावतारी कलाकार करीत आहेत. कोरोना काळात बंद असलेले सांस्कृतिक कार्यक्रम हळूहळू सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांचे कोकणावर जास्त प्रेम आहे. त्यांनी कलाकारांसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री ना.ठाकरे यांनी जाहीर केलेली मदतही जिल्ह्यातील सर्व लोकलाकारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शासनाच्या इतर योजनांचा फायदा जास्तीत जास्त दशावतारी कलाकारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. दरवर्षी 100 कलाकारांचे मानधन योजनेचे प्रस्ताव मंजूर होतात, त्यात वाढ करून दरवर्षी 250 प्रस्ताव एकाचवेळी मंजूर होऊन त्यांना लाभ मिळावा यासाठीही शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.वैभव नाईक यांनी यावेळी दिली. यावेळी ज्येष्ठ दशावतारी कलाकार आप्पा दळवी यांचा खा.राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक अकादमीचे सचिव प्रकाश तांबे, स्वागत अध्यक्ष दिनेश गोरे यांनी तर सुत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =