You are currently viewing विवाहितेचे स्वप्न
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

विवाहितेचे स्वप्न

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ सीमा श्रीराम शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*

*विवाहितेचे स्वप्न*

प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाने काही ना काही स्वप्न पाहिलेले असते. कोणाचं स्वप्न अगदी मोठं असतं तर कोणाचं त्याच्या कुटुंबाशी निगडित असतं. पण आज मी तुम्हाला प्रत्येक सामान्य किंवा असामान्यही असलेल्या विवाहितेचे स्वप्न काय असतं हे सांगणार आहे.
अनेक वर्षांपासून नोकरीच्या माध्यमातून आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून सर्वच स्तरावरील महिलांबरोबर माझ्या गप्पा किंवा चर्चा होतात. खरं सांगू त्यातून एक लक्षात आलं ते म्हणजे प्रत्येक विवाहित स्त्रीची खूप काही मोठी स्वप्न नसतात. ती खूप साधं स्वप्न ती पाहते. विचार करताय का तिचं म्हणजे प्रत्येक विवाहित स्त्रीचे सारखंच असलेलं स्वप्न कोणतं असेल? अहो तेच तर सांगणार आहे मी.
वर्षाच्या 365 दिवसांमधून तिचा, फक्त तिचा, निदान एक दिवस तरी हवा. तुम्ही म्हणाल रोजचाच दिवस तिचा असतो. हो असतो ना. पण तो रोजचा दिवस असतो फक्त कामाचा, कर्तव्याचा, जबाबदारीचा. पण तिच्या स्वप्नातला दिवस तिला तिचा हवा असतो. फक्त तिचा. तुम्ही म्हणाल “ती तिच्या मैत्रिणींबरोबर जाते की गावाला. तिथे आम्ही कुठे असतो?” किंवा काही म्हणतील की दुपारी तिला काय काम असतं? टीव्ही आणि गप्पा तीच्याच असतात ना?”
हो हो हो पण घरातली, बाहेरची सगळी आणि सगळ्यांची काम करून मग ती टीव्ही पाहते, गप्पा मारते, पण तेव्हाही काहीतरी काम करतच असते ना.
मग एवढे दिवस फक्त कुटुंबासाठी जगणाऱ्या माझ्या प्रत्येक सखीला प्रत्येक महिन्यात एक दिवस विश्रांती दिली तर? अहो वाचून सुद्धा कपाळावर आठ्या आल्या ना? ठीक आहे महिन्यातून नाही वर्षातून एक दिवस तरी आपलं कुटुंब त्या सुनेला, विवाहितेला विश्रांती नाही देऊ शकत का? जी एकटी वर्षभर संपूर्ण कुटुंबाला वेळ देते, प्रत्येकाची आवड, आरोग्य, वेळ, पैसा जपते. तिला संपूर्ण कुटुंब मिळून वर्षातला अवघा एक दिवस, अहो फक्त एक दिवस विश्रांती नाही देऊ शकत का? तुम्ही म्हणाल ठीक आहे. तिला माहेरी पाठवू. बाहेर पाठवू. पण नाही हं तसं नाही चालणार. माझी सखी घरीच राहील. आणि मगच तिचं सगळं संपूर्ण स्वप्न पूर्ण होईल. घाबरू नका. तिच्या स्वप्नामुळे कोणाला त्रास होणार नाही. पण तरी तिचं स्वप्न पूर्ण होईल. आता मात्र तुम्ही रागावण्याच्या आत तुम्हाला आम्हा प्रत्येक महिलेचं स्वप्न सांगतेच.


वर्षातला एक दिवस ‘तिचा’ असावा.मला वाटतं तिचा ‘वाढदिवस’ हाच तो दिवस असेल तर कित्ती छान! त्या दिवशी तिला सकाळी उठण्याची घाई नसावी. तिला जाग येईल तेव्हा तिने उठावं. उठल्याबरोबर तिच्या आंघोळीची तयारी केलेली असावी. तिच्यासाठी कपडे ठेवलेले असावेत. आंघोळीनंतर तिला कोणीतरी चहा किंवा कॉफी बिस्किट जागेवरच आणून द्यावे.लगेच तिची कपबशी घेऊन धुऊन ठेवावी. तिला टीव्ही पाहायचा असेल तर किंवा तिच्या आवडीच्या ठिकाणी कुठेही घरात बसून तिला तिथेच तिच्या हातात गरमागरम नाष्टा आणून द्यावा. त्यानंतर तिला कोणतंही काम न करता तिला घरातच थांबायचं असेल तर घरात किंवा बाहेर जायचं असेल तर खुशाल बाहेर जाऊ द्या. मग ती बाहेरून आली तर तिला लगेच गार पाणी किंवा सरबत द्यावं. तिची इच्छा असेल तेव्हा सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावं. जेवणात सगळे पदार्थ तिच्या आवडीचे किंवा तिने सांगितलेले करावे. जेवणाची पूर्ण तयारी करून नंतर तिला जेवणाचं ताटच वाढावं. जेवण झाल्यावरही लगेच हात धुवून तिला राहिलेलं न आवरू देता पाठवावं. तिला झोपायचं असेल तर झोपू द्या किंवा तिला हवे ते करण्याची मुभा द्यावी. दुपारी चहा किंवा कॉफीच्या वेळी पुन्हा तिला भेट द्यावी. संध्याकाळी तिच्याबरोबर तिची इच्छा असेल तर बाहेर फिरायला जावं. तिची इच्छा असेल तर किंवा तुम्ही तिला छान आईस्क्रीम नाही तर काही खायला बाहेर घेऊन जा.तिला एखादा गजरा किंवा वेणी किंवा फुल घेऊन द्या. रात्रीचे जेवण झाल्यावर पुन्हा बाहेर फिरायला घेऊन जा. सगळ्यांसमोर तिला शुभेच्छा द्या. आणि केक कापा किंवा तिला भेटवस्तू द्या.घरी आल्यावर तिची दृष्ट काढून पुन्हा एकदा सगळ्यांनी तिला शुभेच्छा द्या. अहो 365 दिवसांमधला हा एक दिवस तिचा होऊ द्या. मग बघा उरलेले 364 दिवस ती या एका दिवसाच्या आठवणीत आणि वाट पाहण्यात आनंदाने अधिक उत्साहात घालवेल. मग वाट कसली बघताय तुमच्या घरच्या लक्ष्मीचा वाढदिवस कधी आहे ते पहा आणि तिचं ते स्वप्न प्रत्यक्षात खरं करा. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हालाही आनंद देईल हे नक्की. आणि मला तर वाटतं त्या 365 दिवसांमधला तो एक दिवस म्हणजे जर तिच्या वाढदिवसाचा असेल तर अजून ‘सोने पे सुहागा’ होणार नाही का? चला तर मग बघुयात कोण कोण आपल्या या घरच्या लक्ष्मीच एक दिवसाचं स्वप्न पूर्ण करतंय?

सौ.सीमा श्रीराम शास्त्री मोडक
मुख्याध्यापक
डाॅ.काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार

प्रतिक्रिया व्यक्त करा