You are currently viewing प्रेम, प्रीत, इश्क, प्यार, मोहब्बत…!
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

प्रेम, प्रीत, इश्क, प्यार, मोहब्बत…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…. लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललितलेख*

*प्रेम, प्रीत, इश्क, प्यार, मोहब्बत…!*

तू माझी…मी तुझा
देशील का मला हात तुझा…
आयुष्यभर राहीन सोबत
देशील का मज सहवास तुझा…

*”माझं तुझ्यावर प्रेम आहे…!”*
नकळत्या वयात एकमेकांच्या आकर्षणातून मुलं सहज बोलून जातात पण…
अल्लड वयात प्रेम म्हणजे काय…? हे ज्ञात नसताना एखाद्या मुलाचा, मुलीचा चेहरा आवडतो…रुपावर, त्या व्यक्तीच्या सौंदर्यावर भाळतात…तिला पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते…ती न दिसल्यास मन बेचैन होतं… सैरावरा धावतं…तिची ओढ वेडं करून सोडते… तिचं चालणं..बोलणं… वागणं…सवयी…सर्व काही आवडू लागतं…अगदी तिचे नखरे सुद्धा प्रिय वाटतात… आणि तरुण मुलं त्या आकर्षणालाच प्रेम म्हणतात…! खरंच ते प्रेम असतं का…? नासमज वयात झालेलं ते प्रेम टिकतं का…? असे अनेक प्रश्न नंतर उपस्थित होतात आणि प्रेम या मनुष्याच्या जीवनातील पवित्र उदात्त भावनेला टीकेच्या गर्तेत अडकून पाडलं जातं…


खरतर…कोणत्याही सजीव, निर्जीव वस्तू, प्राण्यांशी आपल्या मनामध्ये आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, आदर निर्माण होणे…आणि ती गोष्ट सहवासात, जीवनात हवीहवीशी वाटणे म्हणजे प्रेम…! आपले दैनंदिन जीवन जगताना कोणत्याही गोष्टीशी शारीरिक, मानसिक, भावनिक संबंध जोडले गेल्याने निर्माण झालेला स्नेह म्हणजे प्रेम…!
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू…
माझ्या सुख आनंदाचे कारण आहेस तू…
काय सांगू कोण आहेस तू…
फक्त हा देह माझा…त्यातील जीव आहेस तू…
असं आपल्या प्रेयसीला, पत्नीला सांगताना खरंच असं वाटून जातं की, प्रेमाचा खास असा दिवस असतो का…?
प्रेम तर आपण रोजंच करतो…मग १४ फेब्रुवारी हाच प्रेमाचा दिवस म्हणून का साजरा करायचा…?
आपल्या देव्हाऱ्यात श्रीगणेशाची पूजा रोजंच केली जाते… परंतु भाद्रपद चतुर्थी अन् माघ चतुर्थीला माघी गणेशाची घरात मुर्तिरूप विधिवत स्थापना करून पूजा केली जाते…का..? काही वैशिष्ट्य आहे म्हणूनच ना…? देव आपल्या अंतरी सदैव असतो…वसतो…आपण त्याला भजतो… तसंच प्रेम ही भावना सुद्धा सदैव आपल्या हृदयात असते परंतु एक निमित्त म्हणून का असेना आपण प्रेमासाठी खास असा दिवस म्हणून एक दिवस ठेवला तर कुठे बिघडते…?


व्हॅलेंटाईन डे…म्हणजे प्रेमाचा दिवस…याची सुद्धा एक आख्यायिका सांगितली जाते… रोमन साम्राज्यात संत व्हॅलेंटाईन यांनी ज्या ख्रिश्चन लोकांचा छळ केला जायचा त्यांची सेवा केली म्हणून त्यास तुरुंगवास भोगावा लागला, फाशीची शिक्षा झाली. फासावर देण्याच्या एक दिवस अगोदर जेलरच्या अंध मुलीला संत व्हॅलेंटाईन यांनी आपले डोळे दान केले आणि त्यासोबत एक भेटकार्ड दिलं…त्यावर त्यांनी तुझा व्हॅलेंटाईन (your valentine) असा संदेश लिहिला. याचा अर्थ कोणालाही भेट देताना, प्रेम करताना ते जीवापाड करावं…आपल्याशी कोणी वाईट वागला तरी आपण चांगले वागावे असा उदात्त हेतू ठेऊन तो दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी संत व्हॅलेंटाईन यांची आठवण म्हणून प्रेम दिवस किंवा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा होऊ लागला…. आपण या सर्व कल्पनेच्या दुनियेत न जाता जसे इतर दिवस साजरे करतो तसा प्रेमाचा दिवस म्हणून प्रेम व्यक्त करायला काय हरकत आहे…?
पूर्वी आपल्या देशात व्हॅलेंटाईन डे वगैरे या संकल्पना नसायच्या… जसजशी डिजिटल क्रांती होत गेली… “सारी दुनिया अपनी मुठ्ठी में” असं जाग आपल्या हातातील छोट्याशा खेळण्यात आपल्या जवळ आलं तसतशा नवनवीन संकल्पना आपली तरुणाई अंगिकारू लागली. शाळा कॉलेजच्या तरुणाईने हातात हात घेऊन बागेत फिरायला जाणे…बागेतील कोपऱ्यात एखाद्या झाडाच्या आडोशाला बसून चोकलेट भरवून…नको ते चाळे करून प्रेमाची उधळण करणे म्हणजे व्हॅलेंटाईन डे अथवा प्रेमाचा दिवस नव्हे…
*तेरे होटोंको मेरे होट*
*लगानेकी तमन्ना हैं..!*
*मोहब्बत की हर दिवार*
*पार करने की तमन्ना हैं..!*
हे असे शायराना अंदाज म्हणजे प्रेम नव्हे…लोकांनी बागेत, रस्त्यावर चालणाऱ्या अशाप्रकारच्या थेरांमुळे प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेलाच अस्पृश्य म्हणून हेटाळणी केली. प्रेम म्हणजे फक्त प्रियकर अन् प्रेयसीच करतात का…? प्रेम मुलं आपल्या आई वडिलांवर करू शकतात…जीवापाड जपणाऱ्या आजी आजोबांवर, भाऊ बहिणीवर, मित्र मैत्रिणींवर करू शकतात…आत्या, काका, मामा, मावशी…अगदी रक्ताचे कुठलेली नाते नसलेल्या परंतु माणुसकीच्या हक्काच्या मानलेल्या नात्यातील व्यक्तींवर करू शकतात… मग प्रेम बदनाम का होते…? समाजप्रिय असलेल्या आपल्या संस्कृतीत कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीने झाली की ती बदनाम होते…लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो… आपण सर्व प्रकारची प्रेमभावना एकाच तराजूत तोलतो आणि त्यामुळे प्रेमावर देखील कर लागतो…तो म्हणजे नजरेचा “वक्र कर” आणि प्रेम ही संकल्पनाच वेड्यांचा बाजार ठरते.
माणूस आपल्या आदर्शावर…तत्वांवर, स्वतःवर करतो ते सुद्धा प्रेमच…!
हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आई वडिलांना जीवापाड प्रेम करणे…त्यांच्या उपकराचे ओझे डोईवर घेऊन नतमस्तक होत त्यांच्या कुशीत विसावणे…हे सुद्धा प्रेमच ना…?
आपल्या म्हातार वयात सुरकुतलेल्या थरथरणाऱ्या हातांनी नातवंडांना “एक घास चिऊचा एक घास काऊचा…” म्हणत पोटभर अन्न भरविणाऱ्या आजी आजोबांच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपणे अन् आजी आजोबांचा हात डोईवरच्या कोमल केसातून हळूवार फिरणे हे सुद्धा प्रेमच ना..?
लहानपणी पासून कितीही भांडले तरी….बहिणीने आपल्या रक्षणासाठी भावाच्या मनगटावर राखी बांधणे…अन् भावाने बहिणीला रक्षणाचे वचन देणे…वेळ, काळ, प्रसंगी धावून जाणे…हे सुद्धा पवित्र प्रेमच ना…?
मित्राने मैत्रीसाठी मैत्रिणीला घरापर्यंत सोडणे… अभ्यासात..आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करणे…सोबत सिनेमा पाहणे…फिरणे, मजा मस्ती करणे अन् आपली मैत्री जपणे हे सुद्धा प्रेमच ना…??
आत्या, मामा, मावशी, काका, अशी कितीतरी रक्ताची नाती आज दुरावताहेत…ही नाती शब्दफुलांच्या हारांमध्ये गुंफून एकत्र आणणे…अन् आयुष्यभर त्याचा सुगंध लुटणे..हे सुद्धा प्रेमच ना…??


अनोळखी व्यक्तीला रक्ताची गरज भासल्यास…मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याचा जीव वाचविणे अन् माणुसकीचे…मानलेले नाते जपणे हे सुद्धा प्रेमच…!
*सखे सावरुन घे तुझ्या हळव्या मनाला…सुरुवात करतोय मी त्या प्रत्येक क्षणास हेरायला…!* असं म्हणत पवित्र प्रेमबंधनात बांधलेलं…पती पत्नीचं नातं जे अग्निभोवती सात फेरे घेऊन आयुष्यभर एकत्र राहण्याची, एकमेकांना साथ देण्याची, प्रेम करण्याची, समजून घेण्याची, पवित्र बंधनात कायम बांधून घेण्याची शपथ घेते…ते सुद्धा उदात्त प्रेमच…!

*मी कशी ओळखू प्रीती… हे हृदय म्हणू की लेणे…*
*प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे*
जगदीश खेबुडकरांच्या या गीतातून प्रेमाविषयी उदात्त भावना प्रकट होत आहे…हृदयाला लेणे म्हणतानाच प्रेम हे देवाघरचे देणे म्हटले आहे…म्हणजेच प्रेमाचं पावित्र्य काय नि किती हे स्पष्ट केलं आहे. प्रेम हे प्रथमदर्शनी कधीच होत नसते…प्रत्येकाच्या मनात एक प्रतिमा आधीपासूनच तयार झालेली किंवा होत असते…आणि अचानक तशी व्यक्ती नकळत भेटली तर…”आपण जिच्या शोधात होतो ते हेच आपलं प्रेम” ही भावना रुजू लागते..थोडक्यात, प्रथमदर्शनी प्रेम जडणे ही दैवी प्रक्रिया, चमत्कार नसतो तर फार पूर्वीपासून प्रेमात पाडायची प्रक्रिया सुरू झालेली असते. प्रत्येकाच्या मनात आपण कोणाला तरी आवडावे ही भावना जन्म घेत असते…आणि आपण कोणाला तरी आवडतो हा अहं सुखावह असतो. तेव्हा ही व्यक्ती प्रेम या संकल्पनेच्या प्रेमात असते आणि कुणा व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा समज करून घेते…म्हणजे माणूस व्यक्तीच्या नव्हे प्रेम भावनेच्या प्रेमात पडतो.
प्रेम ही लौकिक पातळीवरची एक भावना आहे…तिला अनेक पदर आहेत..प्रत्येक पदराला तलम आणि तरल असे सूक्ष्म पापुद्रे आहेत…प्रत्येक पापुद्रा वेगळा तरीही एकसंध…! प्रेम आणि लैंगिकता… शारीर प्रेम आणि अशारीर प्रेम…प्रेम आणि नैतिकता…प्रेम आणि व्यक्तीस्वातंत्र्य असे अनेक पैलू आहेत…फक्त सामाजिक भान ठेऊन तटस्थपणे अलौकिक दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे…तरच प्रेमाचा दिवस असो वा नसो प्रेम आपण हृदयात जपू शकतो…प्रेम खरोखरच जाणू शकतो…!

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =