You are currently viewing महासत्ता

महासत्ता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*महासत्ता*

ट्रीस्ट विथ डेस्टिनी, हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, यांचे स्वातंत्र्य दिवशी दिलेले भाषण. त्यात ते म्हणाले होते,” स्वातंत्र्य आणि सत्ता मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते. आता कष्ट खूप घ्यायचे आहेत. जोपर्यंत आपण देशासाठी घेतलेली शपथ पूर्ण करत नाही तोपर्यंत, आराम हराम आहे.”

आणि खरोखरच गेल्या ७५ वर्षात भारताने, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर उल्लेखनीय प्रगती केलेली आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. अध्यात्मिक संस्कृती हा भारतीय जीवनाचा पाया आहे. विविध धर्म, जाती, वंश यांची एकात्मतेने मोट बांधताना अनेक समस्या आणि संघर्षाला वेळोवेळी सामोरे जावे लागले आहे. आजही समस्या अनेक आहेत. पण तरीही जागतिक पातळीवर भारत प्रगतीपथावर आहे.

भारत हा विकसनशील देश नसून विकसित देश आहे असे आज आपण म्हणूच शकतो. आरोग्य, शिक्षण, दळणवळण, आंतरराष्ट्रीय व्यापार, अंतर्गत आणि जागतिक सीमावाद, पर्यावरण, संशोधन, विज्ञान याबाबतीत भारताने प्रचंड प्रगती केलेली आहे.

जगभरातील देशांशी राजनैतिक संबंधांमध्ये सुधारणा करून भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान आणि भूमिका मजबूत केली आहे.

मागच्याच वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत भारताने तेथून आपल्या नागरिकांना यशस्वीपणे भारतात परत आणले. अफगाण हिंदू आणि शीख अल्पसंख्याकांना संरक्षण दिले. पवित्र गुरु ग्रंथ साहिब सुरक्षितपणे परत आणले. अफगाणिस्तानात वैद्यकीय पुरवठा आणि अन्नधान्य पुरवून मानवतावाद जपला.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पद मिळताच भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सागरी सुरक्षांबाबत व्यापक चर्चा केली. उत्तर पूर्व गोलार्धातील देशातील समस्या मांडल्या. विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचवला. २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे भारताने वचन दिले आहे.

अजूनही चालू असलेल्या रशिया युक्रेंनच्या युद्धाबाबत भारताने घेतलेली भूमिका ही जागतिक पातळीवर प्रशंसनीय म्हणावी अशीच आहे.

कोरोनाच्या काळात लस उत्पादन हे आपल्या भारत भूमीतले अभिमानास्पद असे यशस्वी पाऊल आहे. सारे जग आर्थिक समस्येने ग्रासले असतानाही भारताचा विकासदर, ठराविक पातळी राखू शकला हे नक्कीच लक्षवेधी आहे.

महिला सक्षमीकरण हा देखील देशाच्या प्राधान्यक्रमातील महत्त्वाचा विषय आहे. बेटी बचाव ..बेटी पढाव.. मोहिमेचे अनेक सकारात्मक परिणाम दिसत आहेत. शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येत उत्साहवर्धक वाढ झालेली आहे. तिहेरी तलाक च्या अन्यायप्रथेला कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले आहे. मुस्लिम महिलांच्या हज यात्रेवरील प्रतिबंध देखील उठवले आहेत. महिलांच्या विकासाला वाव देण्यासाठी विवाहाचे किमान वय वाढवण्याचे विधेयक लोकसभेत मांडले गेले आहे. या सर्व घटनांची जागतिक पातळीवर गांभीर्याने नोंद घेतली जात आहे.

मेक इन इंडिया, स्टार्टअप सारख्या योजना भारत देशाला स्वावलंबनाच्या मार्गावर नेत आहेत.

ईसरोची मंगळावरची मोहीम ही सुद्धा जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. भारत देश एक महासत्ता… या स्वप्नपूर्तीसाठी उचललेली अशी अनेक पावले जागतिक राष्ट्रनितीला हादरवून टाकत आहेत.

चीन आणि अमेरिका यांच्या संबंधात तफावत पडत असताना, आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधात भारताला भरपूर संधी आहेत, असे खात्रीपूर्वक म्हणावेसे वाटते.

तसे भारत आणि विश्व… एक ग्लोबल रिलेशन… याचा विचार करताना अनेकविध मुद्दे डोळ्यासमोर येतात. इतर राष्ट्रांशी तुलना करताना आपल्यातल्या त्रुटी ही खेदजनक वाटतात. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रभक्ती. देशप्रेम. देश माझा, मी देशासाठी ही भावना…

मला एक लहानसा प्रसंग आठवतोय. लंडनमध्ये मी ट्रेनने प्रवास करत होते. त्या ट्रेनमध्ये एक माणूस फाटलेली एक सीट शिवत होता. मला वाटले तो रेल्वे कर्मचारी असेल. पण नाही, तो माझ्यासारखाच एक प्रवासी होता. आणि राष्ट्रीय संपत्तीची कर्तव्य बुद्धीने जपणूक करत होता. क्षणभर माझ्या डोळ्यासमोर आले, आपले भारतीय!! आपले काय जाते वापरा कसेही… तंबाखूच्या पिचकार्‍यांनी रंगवा भिंती… रस्ते म्हणजे आपल्याच मालकीचे ..करा कचरा.. आजही एखादा परदेशी प्रवासी चालताना रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचे, झोपडपट्टीचे, रस्त्यांवरच्या खड्ड्यांचे फोटो खेचतो, तेव्हा वाटते जागतिक पातळीवर भारताची काय प्रतिमा उमटेल?

आपल्या नेत्यांचा उद्देश असतो पुढची निवडणूक. पुढची पिढी त्यांचं भविष्य याविषयीचा विचार त्यांच्या डोक्यात असतो का? मी तर म्हणेन हे नेतेच नव्हेत हे फक्त राजकारणी आहेत.

तेव्हा हे सगळं चित्र अमुलाग्र बदललं पाहिजे. अर्थात यात भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने काटेकोरपणे कर्तव्य पालनही केले पाहिजे. लोकशाहीचा एक खरा आणि सुंदर संदेश भारताने जगाला दिला पाहिजे. जागतिक पातळीवर एक उत्तम लोकशाही देश म्हणून अधोरेखित होण्यासाठी नागरिक आणि शासन यात उत्तम संवाद घडला पाहिजे. मग महासत्तेचे स्वप्न नक्कीच दूर नाही…

राधिका भांडारकर अमेरिका

प्रतिक्रिया व्यक्त करा