फ्लिपकार्ट ची सेवा आता भारतीय भाषांमध्ये….

फ्लिपकार्ट ची सेवा आता भारतीय भाषांमध्ये….

मुंबई:

महाराष्ट्राच्या राजभाषेला (मराठी) मानाचे स्थान मिळावे म्हणून मनसेने ई-कॉमर्स क्षेत्रातल्या दोन तगड्या कंपन्यांना दोन दिवसांपूर्वी आक्रमक पवित्रा घेत मराठीभाषेतही माहिती देणारं ॲप आणावं म्हणून सभ्य भाषेत समजावलं होतं.

१५ ऑक्टोबरला मनसेच्या अखिल चित्रे यांनी या दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयांना भेट देऊन त्यांना आपली बाजू मांडली होती. याबाबत अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने मराठी अ‍ॅप आणावं अन्यथा. मनसेचा पुन्हा आक्रमक पवित्रा अशा आशयाचं वृत्त ‘नवराष्ट्र.कॉमने काल प्रसिद्ध केलं होतं. याबाबत आज फ्लिपकार्टने आपली भूमिका मांडली आहे. ती पुढीलप्रमाणे :

ग्राहकांना नवनवीन दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी ईकॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली फ्लिपकार्ट भारतात ई-कॉमर्स सर्वदूर पोहोचवण्यासाठी; तसेच या उद्योगाचे लोकशाहीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे. येत्या काही महिन्यांत, ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट काही अत्यंत नाविन्यपूर्ण गोष्टी सादर करणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य अनेक भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असेल. भारतात सर्वदूर पोहोचण्यासाठी आपल्या देशातील विविध भाषा आणि व्हॉइस सोल्यूशन्सचा वापर करण्याचा फ्लिपकार्टचा निर्धार आहे.

मातृभाषेतून ई-कॉमर्सच्या वापरामुळे या उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित तर होतीलच; पण आपल्या देशातील लाखो लघु उद्योजक व मध्यम उद्योजक तसेच कारागिरांनाही एक प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. असं फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा