You are currently viewing वैभववाडी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी भाजपाचे प्रमोद रावराणे : व्हा. चेअरमनपदी अंबाजी हुंबे बिनविरोध

वैभववाडी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी भाजपाचे प्रमोद रावराणे : व्हा. चेअरमनपदी अंबाजी हुंबे बिनविरोध

केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचविणार – प्रमोद रावराणे

भुईबावडा येथे लवकरच संघाचे केंद्र सुरु करणार

वैभववाडी

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी भाजपचे प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हा.चेअरमन पदी अंबाजी हुंबे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व सहकारातील पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी तसेच सर्व संचालकांनी प्रमोद रावराणे, अंबाजी हुंबे यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना प्रमोद रावराणे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तसेच वर्षभरात 1000 सभासद संख्या संचालकांना विश्वासात घेऊन वाढविणार आहे. भुईबावडा येथे संघाचे खरेदी विक्री केंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. संघाच्या मालकीची इमारत असावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खत विक्री व भात खरेदी बरोबर तालुक्यात दुग्ध उत्पादन वाढ, बांबू लागवड, कुक्कुटपालन व इतर पूरक व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना आर्थिक सदन करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. भात विक्रीतून चारशे पाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 34 लाख रक्कम जमा झाली आहे. यंदाही संघामार्फत भात खरेदी केले जाईल असे सांगितले. कमी किमतीत शेतकऱ्यांकडून भात खरेदी करणाऱ्या बेकायदेशीर व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे यावेळी प्रमोद रावराणे यांनी सांगितले. या संघासाठी कायदेशीर सल्लागार नियुक्त करणार त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हितासाठी वर्षभरात पाच प्रशिक्षण राबविणार असेही रावराणे यांनी सांगितले. चेअरमन पदावर संधी दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे तसेच वैभववाडी भाजपचे आभार मानले.

यावेळी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जेष्ठ पदाधिकारी सज्जनकाका रावराणे तसेच सर्व संचालक भाजपा पदाधिकारी आदी उपस्थित होते. निवडीनंतर ठाकरे गट शिवसेना, शिंदे गट शिवसेना पदाधिकारी यांनी रावराणे, हुंबे यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा