You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सव आणि जुगाराच्या मैफिली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सव आणि जुगाराच्या मैफिली…

*तरुणाईच्या दृष्टीने चिंतेचा विषय*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळी सणाच्या नंतर जत्रोत्सवांना मोठ्या दिमाखात सुरुवात होते. मुंबई, पुणे आदी भागातून चाकरमानी देखील आपल्या ग्रामदेवतेच्या/कुलदेवतेच्या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात. वर्षातून एकदा असणारा जत्रोत्सव म्हणजे देवाप्रति असलेली श्रद्धा आणि वार्षिक मान, नवस फेडण्यासाठी मिळालेली संधी म्हणून दूरदूर वरून गावातील लोक जमा होतात. नारळ, ओटी, केळी आदी रुपात देवाला शरण जातात. कोकणात प्रत्येक गावात जत्रोत्सव होतात आणि मोठ्या प्रमाणावर जत्रोत्सवांना गर्दी होते.

मागच्या काही वर्षात जत्रोत्सवात जुगारांवर बंदी आल्यानंतर जत्रांमधील गर्दी कमी झाली, व्यापार कमी झाला असा एक मतप्रवाह तयार झाला आहे. खरंतर जत्रोत्सव म्हणजे धार्मिक विषय परंतु कोणत्याही सणाचे, उत्सवाचे औचित्य साधून आपली पोळी भाजून घेणारे अवैध व्यवसाय करणारे नवनवीन फटाके फोडतात आणि जुगाराचे समर्थन करतात. जुगारांमुळे जत्रा भरतात असं सांगून काही स्थानिक जुगार खेळणारे व स्थानिक खाकी वर्दीच्या अमलदारांना हाताशी धरून जत्रोत्सवात जुगाराच्या मैफिली सजवतात.

ज्या गावात जत्रोत्सव असतो तेथील आजूबाजूला असणाऱ्या बागांमध्ये, रानात चार्जिंग दिव्यांच्या उजेडात जुगाराची पालं टाकली जातात. जुगारातून बक्कळ पैसा मिळतो या आशेवर गावातील तरुणाई त्याकडे आकर्षित होते. “घुडघुड्या” पासून जुगाराची होणारी सुरुवात नंतर “लाल-काला” पर्यंत जाते. युग प्रगतीचे आहे, हळूहळू जुगाराची चटक लागलेली ही मिसरूड न फुटलेली तरुणाई जुगाराच्या पालांवर “अंदर-बाहर” पत्त्यांच्या डावावर बसते. घरातून खर्चासाठी दिलेले पैसे संपले की कुणाच्या तरी खिशावर हात साफ करून जुगार खेळते. त्यामुळे जत्रोत्सवातील जुगारांमुळे मिसरूड सुद्धा न फुटलेली मुले जुगाराच्या नादात आयुष्य बरबाद करतात. गॅम्बलर हे जत्रोत्सवातूनच पुढे येतात.

जत्रा सुरू झाल्या आणि त्या त्या भागातील छोट्या मोठ्या जुगाऱ्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवात जुगार ठरविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दोडामार्ग तालुक्यातील आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडामार्ग तालुका हा गोव्याच्या सीमेवर असल्याने गोव्यातील अनेक मोठमोठे जुगारी दोडामार्ग तालुक्यातील जत्रोत्सवात जुगार खेळण्यासाठी येतात. दोडामार्ग तालुक्यातील बऱ्याच जत्रोत्सवात जुगाराच्या मैफिलींमध्ये लाखोंची उलाढाल होते. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जत्रोत्सवात जुगार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस प्रशासनामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक बदलले गेले असून जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर नव्याने अग्रवाल साहेब रुजू झाले आहेत. त्यामुळे नवीन जिल्हा पोलीस प्रमुखांकडून जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या असून जिल्ह्यातील तरुणाई बरबाद करणारे, लोकांचे संसार बरबाद करणारे जत्रोत्सवातील जुगार कायमस्वरूपी बंद होतील अशी आशा वाटते आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =