‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’…

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’…

मुंबई :

वाढीव वीजबिल माफीचा निर्णय  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही  घेण्यात आलेला नसल्यामुळे  मनसे त्या विरोधात आक्रमक पाऊले उचलली आहेत. वीज दरवाढी विरोधात सोमवारनंतर आंदोलन करण्याचा निर्धारच मनसेने केला असून त्यांनी दरवाढी विरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी केली आहे.

 

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारच्या ने आखलेल्या ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या  घोषणेलाच निशाणा करून ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी सणसणीत खोचक वाक्यं या होर्डिंगजवर लिहिण्यात आली असल्याने या होर्डिंग्जच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. यावरून मनसेने वीजबिल माफीच्या विरोधात दंड थोपाटले आहेत.

 

उद्या सोमवारपासूनच मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारविरोधात मनसेने दादर आणि माहीम परिसरात होर्डिंगबाजी करून गंभीर वातावरणाची निर्मिती केली आहे. ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, आणि ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’, अशा घोषणा या होर्डिंगवर लिहून सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच सोमवारी भेटूच, शॉकसाठी तयार राहा, असा इशारा देत मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर धरले आहे.

 

मनसेनेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावले आहेत. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असून ते राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. याच बरोबर सर्वसामान्यांचा विचार करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांना केवळ त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत आहोत, त्यामुळेच ही होर्डिंगबाजी करण्यात आली आहे, असं सांगतानाच सोमवारी वीजदरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा आमच्या पक्षाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्हाला आमचं आंदोलन दिसूनच येईल,’ असं यशवंत किल्लेदार म्हणाले.

 

याच दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन ‘राज्यात सोमवारनंतर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सोमवारनंतर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे मोर्चे निघतील. सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील. आमची पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे,’ असा इशारा त्यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा