You are currently viewing स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सबबी सांगून पळवाट काढू नका – सत्यवान रेडकर

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सबबी सांगून पळवाट काढू नका – सत्यवान रेडकर

कुडाळ :

 

“यशस्वी व्हायचे असेल तर सबबी सांगून कमतरतेचे / समर्थन करून पळवट काढू नका. त्यावर मात करण्याची जिद्द ठेवा. स्वतःला घडवायचं असेल तर आळस टाकून नवीन ज्ञान घेत चला. ज्ञानाने संपृक्त बना. अतोनात मेहनतीने यूपीएससी, आयपीएस, आयएएस, एमपीएससी परीक्षा पास होता येते व आपले ध्येय गाठता येते. असे उद्गार तिमिरातूनी तेजाकडे चे संस्थापक अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री सत्यवान रेडकर यांनी काढले. ते बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संदर्भात आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मार्गदर्शनपर मनोगतामध्ये ‘स्पर्धा परीक्षां संदर्भात विविध टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या- सामान्य ज्ञानासाठी नियमित वर्तमानपत्र वाचणे, टीव्हीवरील बातम्या ऐकणे, याचे महत्त्व प्रतिपादन करीत बुद्धिमत्ता चाचणीसाठी कशी तयारी करावी, गणिती समीकरणे, बैजिक गणितं कशी सोडवायची ? इंग्रजी- मराठी व्याकरणासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ? या संदर्भातील महत्त्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या व आपले झपाटलेपणच आणि ज्ञानाच्या बाबतीतली असंतुष्टता आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाऊ शकते. असे सांगत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील मुले स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वतःची पदरमोड करून शाळांमध्ये जाऊन ते निःशुल्क मार्गदर्शन करतात.कोण कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा? याचे उचित मार्गदर्शने त्यांनी विद्यार्थ्यांना केले. स्वतः ते सावंतवाडी तालुक्यातील कवठणी येथील बोरभाट वाडीचे सुपुत्र असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ते एमपीएससी परीक्षा पास झाले . २०१७ च्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत’ संपूर्ण भारतात 323 वे येऊन ते मुंबई येथील सीमा शुल्क विभागात ज्युनियर ट्रान्सलेटर म्हणून कार्यरत आहेत. आपल्यासारखेच सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे या उद्देशाने सुट्टी घेऊन त्यांनी विविध भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले . आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनमधील स्फुल्लिंग जागृत करण्याची सतत धडपड ते करत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल शिक्षण संस्थेच्या ‘करिअर गायडन्स विभागाच्या’ वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व बॅ. नाथ पै यांच्या चरित्रावर आधारित पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम समन्वयक प्रा. अरुण मर्गज यांच्या पुढाकाराने या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी मुंबई स्थित संतोष परब, निलेश तेरसे व संस्थेतील विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य ,प्राध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थीही बहुसंख्येने या कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रा. अरुण मर्गज यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा