You are currently viewing आपला हात जगन्नाथ

आपला हात जगन्नाथ

*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी श्री. श्रीकांत दीक्षित लिखित अप्रतिम लेख*

*आपला हात जगन्नाथ*

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
माझ्यासाठी म्हणाल तर हात हा विषय खूप भावनीक आहे. कारण वडिलांचे छत्र होते तोपर्यंत एक भक्कम आधार होता. कारण * “बापाचा हात उशाला असेपर्यंत आयुष्याला गादीची गरज पडत नाही….!”*
माणसांचे सर्वच अवयव फार महत्वाचे आहेत. त्यामध्ये हा हात पण महत्वाचा…, सकाळची सुरूवात आपण हात जोडून , *”कराग्रे वसते लक्ष्मी”* यानेच तर करतो ना??…अन सायंकाळची ती बालचमूंची हात जोडून असणारी प्रार्थना..*”शुभंकरोती कल्याणम!!..”* तर वडीलधारी मंडळी, गुरूजन वर्ग, परमेश्वर हे पहाता *”तेथे कर माझी जुळती.”*

हो अन् एक सांगायचं राहिलंच की हातानी पण आपापली काम वाटून घेतलीत..  डाव्या हाताची वेगळी तर उजव्याची वेगळी. एक मात्र या दोन्ही हाताकडून शिकण्यासारखे आहे. जरी असला कमजोर डावा हात तरी त्याच्या मदतीला लगेच उजवा हात धावून जातो. डावा हात पण नेहमी उजव्याला साथ करत असतो. *”एकमेकां करू सहाय्य अवघे धरू सुपंथ.”* हे कुणी दुसऱ्याने शिकण्याची गरज नाही.  याची देहा, याची डोळा… फक्त लक्ष राहू द्या.

भरगच्च खिशाला लावलेले हात, चुकीच्या सवयीने, व्यसनाने कधी कपाळावर जातात हे समजत नाही. मग मदतीसाठी हात पसरवणारी लोकं समोरच्याला किती हातोहात फसवतात, याबद्दल तर बोलायलाच नको. अगदी हातावर तुरी देऊन पण पोबारा करणारी अगणित आहेत. या गोष्टी आगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पहायला मिळतात. मग या सगळ्यात ही दगडाखाली हात सापडलेल्या मंडळींचे मात्र हाल कोणी विचारत नाहीत. मग यावेळी मनात एक विचार येतो आपले हात तरी कोठे आपले असतात, अशी उद्विग्न अवस्था होते. कारण प्रथम नमस्कारासाठी जोडलेलेच हात मग उगारले जातात. आणि यात चुकीचे काय आहे??.. पण काही मंडळी फार हुशार असतात कारण ते वागतानाच हातचे राखून वागतात. उगी हात दाखवून अवलक्षण कशाला अशी म्हणणारी पण मंडळी आहेत. काही जण तर मदत करतात पण या हाताचे त्या हाताला कळू देत नाहीत.
कष्टाने खरबरीत झालेले हात मात्र उबदार असतात. त्यात मायेची उब असते.पण यांच्याच पदरात दुःख, संघर्ष पडते. त्यावेळी डोळे पाणावतात. जन्मभर आपले आयुष्य उज्वल बनावे म्हणून हात धुवून पाठीमागे लागणारी मंडळी, एक चांगला हेतू.. पण याच मंडळीची वृद्धापकाळात हांजी हांजी होते. वृद्धापकाळात मायबापानी आशिर्वाद देण्याचे हात पण  आज आपण पहातोय मुलांपुढे थरथरते हात पसरतात. पण निष्ठूर मंडळी अजून निष्ठूर होतात. मन भरून जाते. हातात हात देऊन ज्यानी या जगात पहिले पाऊल टाकायला शिकवलं, आता तेच हात बाजूला सारले जातात. मग याच आधार दिलेल्या हातांना माती सारायला हात सतावतात.

आणि एक नुसतंच हातावर हात ठेऊन बसणं पण चालत नाही. हातांना नेहमी काम हवं. नाहीतर मग नुसतेच हात चोळत बसायची पाळी येते. नेहमी चांगल्या संधीच्या शोधात राहून संधीचे सोने करत रहा. शेवटी आपला हात जगन्नाथ!!..आपल्या बरोबरच इतरही हातांना काम द्या..हातातील मनगटात फळं असायला हवं.

शेवटी एक प्रार्थना कराविशी वाटते…पत्नीबद्दल…

हात तुझा हाती घेवूनी साथ दिली तू साता जन्माची
नाते आपुले अतुट हे याला ना लागो दृष्ट कोणाची
सप्तपदी चालता चालता वचने घेतली सातजन्माची
आपली प्रीती अखंड राहो ही ईच्छा आहे देवाची
*खरं तर या हातावर बहिणींने बांधलेली राखी म्हणजेच एक रेशीम धागा. सदैव रक्षणासाठी असणारा भाऊ पाठीशी आहे याचेच द्योतक आहे. ते आपले आद्य कर्तव्य आहे. हा पुर्ण लेख माझ्या सर्व ताईंना समर्पित.*

●○●○○●○○●○○●○○●○○●
🙏🌷
*श्रीकांत दीक्षित. शाहूनगर, पुणे.©*
8805988172
••••••••••••••••••••••

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =