You are currently viewing मनाला दार असते तर….!!

मनाला दार असते तर….!!

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख

किती सुंदर कल्पना!!
मनाला दार असते तर…
खरं म्हणजे आपण जाणीवेत नेणीवेत सतत मनाबरोबरच
असतो की ..क्षणोक्षणी आपण काही ना काही मनात कोंबतच असतो.आणि आयुष्याच्या इतक्या वर्षात कितीतरी मनाच्या आत साठलेलं असणार..ते डोकावून बघायचं ठरवलं तर मनाला दार हवच.जे हवं तेव्हां उघडता येईल आणि हवे तेव्हां कुलुप लावुन बंदही करता
येईल….
मनाचे दार उघडेन अन् पाहीन त्यातला पसारा..
इतक्या वर्षाची अडगळ साठली असणार तिथे..
दार उघडुन जेव्हां मी मनात शिरेन ना तेव्हां मनाचे सगळे कप्पे उघडतील…त्या कप्याकप्प्यात साठलं गेलेलं
कितीतरी पाहता येईल…
काहीमधे असतील फुलपांखरं..नाचणारी बागडणारी फुलाफुलातला मध गोळा करणारी .ती ठेवेन जपुन..
पण काही कप्प्यांत खूपच कचरा असेल..वेदना दु:खं
वियोग नकार फसवणुक अपमान विश्वासघात पराभव अपयश… निंदा भांडणं ..नको .नकोच ते बघायला.सगळं उपसायला हवं. कशाला बाळगायचं..?मनाचा हा खण साफ करेन.
सगळं फेकुन देईन. कल्पनेतही किती मोकळं स्वच्छ वाटायला लागल,..!!
काही मनाचे खण मात्र हुरहुर लावणारे असतील..
त्यात अनेक तुटलेली दुरावलेली रेंगाळत राहणारी किंवा नव्याने झालेली नाती असतील…
एकेक नातं उघडुन बघेन..काही अगदीच त्रास देणारी
काढुनच टाकेन .ऊगीच मनावर ओझं नको.
पण काहीसांठी घेईन प्रेमाचा धागा,मैत्रीची सुई अन् घालीन टाके छान जोडण्यासाठी..आणि ठेवेन नीटनेटकी रचून..नव्या नात्यांना मुरायला थोडा वेळ हवा म्हणून ती
राहू देईन.
तरिही मनाचं कपाट भरलेलच असणार.काही कप्पे विनोदाने हास्याने ओसंडत असतील .प्रेम वात्स्यल कौतुक असं छान छान दिसेल.मनाचं दार उघडलं ना की मी प्रथम हेच डोळेभरुन पाहुन घेईन .ताजतवानं शुद्ध
वाटेल… पण तिथे रिकामे कोनाडेही असतील ना?
ईथून पुढे त्यांची मात्र काळजी घेईन .सदा स्वच्छ ठेवेन.
नसता कचरा होउच देणार नाही…
असा विचार करत असताना ,मनाला दार असते तर
याची कल्पना करत असताना चटकन् ध्यानात आले ,
अरे !मनाला दार असतेच की..ते उघडण्याची किल्ली सुद्धा आहे आपल्याकडे..पण आपणच कधी मनाचे दार ऊघडण्याची ,त्यात डोकावण्याची तसदीच घेत नाही..
हवं तेव्हां दार उघडु शकतो .नको तेव्हां कुलुपही घालु शकतो..
इतकच काय आपण इतरांच्या मनाचीही दारं ऊघडु शकलो तर….?
तिथेही एखादा फेरफटका मारता आला तर….
कोणजाणे..दोन प्याले ठेऊ जवळ..
एक सुखाचा ,
एक दु:खाचा.

धन्यवाद!!
सौ. राधिका भांडारकर
पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + nine =