You are currently viewing प्रेम की आकर्षण ?

प्रेम की आकर्षण ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमतीताई पवार लिखित अप्रतिम लेख*

*प्रेम की आकर्षण ?*

मोठा कठिण प्रश्न आहे हो हा! माणसापासून माणूस निर्माण
होऊन समाज निर्माण होतो. अनादी कालापासून अखंडपणे ही
प्रक्रिया चालू आहे.नवा समाज निर्माण व्हावा व तो टिकावा या
साठी निसर्गानेच भिन्न लिंगी व्यक्तिंमध्ये आकर्षण निर्माण केले आहे. हे आकर्षण अत्यंत नैसर्गिक असून पृथ्वी वरील सर्व
प्राणिमात्रांत ते आहे म्हणून किडामुंगी पासून हे पुनुरूत्पादनाचे
काम अखंड व अव्याहतपणे चालूच आहे.अगदी झाडे पाने फुले ही याला अपवाद नाहीत. झाडे ही सजीवात मोडतात व आपला वंश वाढवतात हे आपण बघतो आहोत. सृष्टी टिकून
राहण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.कुत्री मांजरी बकरी
पक्षी सारेच आपापल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतात, कारण ही
निसर्गाने बहाल केलेली देणगी आहे. वयात आल्यावर माणसांसह सारेच आपल्या जोडीदाराला आवडू लागतात व
त्यातूनच सृजनाची प्रक्रिया घडते.व नवा समाज निर्माण होतो .

म्हणजे निसर्गानेच प्रेम व आकर्षणाची व्यवस्था करून ठेवली
आहे. व त्यातून मग प्रेम वाढीस लागले व सहजीवनाची म्हणजे
जोडीने राहण्याची परंपरा निर्माण होऊन त्याला लग्नाचे परिमाण मिळून धार्मिक आधाराने त्याला पक्के बांधण्यात
आले जेणे करून कुठलेही अराजक माजणार नाही व त्याचे
पावित्र्य व नैतिकता टिकून राहिल. ह्या व्यवस्थेचा चांगलाच
सुपरिणाम जाणवायला लागला व समाजाने ही व्यवस्था
अधिक मजबूत करून त्याला कायद्याचे पाठबळ दिले व
लग्नसंस्था उत्तम प्रकारे स्थिरावली.ती आजतागायत हे
आपण बघतो आहेत.

हे जे नाते निर्माण होते त्याला जगात तोड नाही.व हे प्रेम किती
पझेसिव्ह असते ते आई झाल्याशिवाय कळणे केवळ अशक्य
आहे.मुलाला जन्म दिल्या नंतर आपल्या हाडामांसाच्या गोळ्या
विषयी मातेच्या मनात जे अपरंपार प्रेम निर्माण होते, त्याला तर
उपमाच नाही . जीवापाड की काय म्हणतात त्या जातकुळीतील हे प्रेम असते.इतके की मुलगा व आई कोणत्याही परिसिमेपर्यंत एकमेकांसाठी त्याग करू शकतात.इतके हे नाते जगा वेगळे असते. नवरा बायको ही
एकमेकांसाठी काहीही त्याग करू शकतात ह्याची उदाहरणे
समाजात आपल्याला बघायलाही मिळतात.

म्हणजे बघा आधी आकर्षण व नंतर सहवासाने मने जुळल्यावर प्रेम निर्माण होते. अर्थात ह्याला काही अपवाद ही
असतात. अपवाद तर तसे सर्वच क्षेत्रात असतातच. पूर्वी प्रेम
विवाहांचे प्रमाण कमी होते. आता त्याचे प्रमाण खूप वाढले
आहे. तेव्हा नक्की काय घडते हे आम्ही जुने लोक कसे
सांगणार? प्रेमविवाह होतात, तिथे भांडणे होत नाहीत असे
थोडीच आहे? भांडणे सर्वत्र होतात. अपवादाने अशी जोडपी
असतील की त्यांच्यात भांडण झाले नसेल. मुळात लग्न हाच
मोठा प्रचंड जुगार आहे. कोणाच्या पदरात काय दान पडेल
काही सांगता येत नाही. जे जुळवून घेतात त्यांचेच संसार
टिकतात अन्यथा घटस्फोट आहेच ! तडजोड म्हणजेच
संसार आहे. तडजोड केली नाही तर फाटलेच म्हणून समजा.
आपण जन्माला घातलेल्या मुलांचे भावविश्व उध्वस्त होऊ नये
असे वाटत असेल तर तडजोड केलीच पाहिजे. त्यात त्या मुलांनी का भरडून निघायचे? त्यांचा काय दोष आहे त्यात ?

प्रेम की आकर्षण हा आपापल्या परीने सोडवायचा प्रश्न
आहे. यात खूप मतभिन्नता असेल नि ती ही अत्यंत स्वाभाविक
आहे .बरंय् मंडळी … धन्यवाद ..

आणि हो , नेहमी प्रमाणे ही माझीच मते आहेत .

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ३ ॲागष्ट २०२२
वेळ : रात्री १० : ०७

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − two =