You are currently viewing सॅलड बाऊल

सॅलड बाऊल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*सॅलड बाऊल*

विष्णुपुराणात एक श्लोक आढळतो.
उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्णं तद् भारतम् नामभारती यत्र संतति:।।

या श्लोकाचा अर्थ असा… एक असा देश, जो समुद्राच्या उत्तरेला आणि बर्फाळ डोंगराच्या दक्षिणेला आहे, ज्याला भारतम म्हटले जाते. आणि येथे भारत वंशाच्या अस्तित्वाचे पुरावे देखील मिळालेले आहेत.

ऋग्वेदात दशराज युद्धाचे वर्णन आहे. हे युद्ध दहा राजांचा महासंघ आणि भरत जमातीचा राजा सुदास यांच्यामध्ये पंजाबच्या रावी नदीवर झाले. राजा सुदास चा विजय झाला. आणि भारत वर्ष व भरताची भूमी या नावाने ती ओळखली जाऊ लागली.

महाभारतानुसार आपल्या देशाला भारत वर्ष हे नाव राजा भरत चक्रवर्ती याच्या नामावरून पडले. राजा भरत हे राजवंशाचे संस्थापक आणि कौरव पांडव यांचे पूर्वज होते. ते दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचे पुत्र होते.

भारतीय संविधानानुसार भारत म्हणजे रिपब्लिक ऑफ इंडिया. भारतीय गणराज्य. दक्षिण आशियातील एक प्रमुख देश. जगातला सातवा मोठा देश. आणि जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक देश.

भारताला हजारो वर्षाचा जुना इतिहास आहे. अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म याबाबतीत या देशाचा मोठा वारसा आहे. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रीती रिवाज इथे आहेत. परंतु या विविधतेतही एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.

भारतात 29 राज्ये आणि नऊ अनुशासित राज्ये आहेत. जवळजवळ 800 भाषा आणि 200 बोलीभाषा येथे बोलल्या जातात. हिंदू, ख्रिश्चन, सीख, बौद्ध, जैन, मुस्लिम, झोराष्ट्रियन, यहुदी असे अनेक धर्माचे लोक इथे सन्मानाने राहतात. भारत हा धर्मनिरपेक्ष.. धर्म सहिष्णुता मानणारा देश आहे. इथे विविध धर्माचे आणि समुदायाचे लोक शांततेत आणि सामंजस्याने राहतात. भारतात सर्व लोकांना त्यांच्या धर्माचा प्रचार आणि सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे.

विविधता म्हणजे विभिन्नता. आणि या विभिन्नतेत एकता हे भारताच्या बाबतीतले सुवचन आहे. अजिबात विविधता नाही असा समाज फारसा कुठे नसतो पण विविधतेकडे कसे बघायचे आणि त्याची व्यवस्था कशी लावायची हे महत्त्वाचे. विविधता, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि अंतिम शांती, स्थैर्य आणि सुव्यवस्था यांचा समतोल कसा साधायचा हे भारता पुढचे मोठे आवाहन असले तरी ते शिवधनुष्य भारताने पेलले आहे.

अतिथी देवो भव।। ही भारतीयांची मूलभूत सांस्कृतिक विचारधारा असल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धर्म, जात, वंश, वर्ण या विविधतेमुळे बाधा पोहोचत नाही हे भारताने वेळोवेळी सिद्ध केले आहे.

अर्थात अतिरिक्त अभिमान हे वादाचे मूळ कारण होऊ शकते. अवास्तव धर्माभिमानामुळे विभिन्न समूह तयार होतात. त्यात संघर्ष होतात. मग बहुसंख्य अल्पसंख्यांक अशा भिंती पडतात. भाषा, जाती-वर्णावरून नवे सीमावाद उभे राहतात. आरक्षणासारखे मुद्देही अशांतता निर्माण करतात. विशेषतः राजकीय नेत्यांकडून हे मुद्दे अयोग्य पद्धतीने उचलले जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अराजकता अस्थैर्य अनुभवायला येते. एकाच वेळी, अनेकतेत एकता हे बजावतानाही या अडचणींना सामोरे जावे लागते. आणि याचा फायदा शेजारची राष्ट्रे घेऊ पाहतात आणि देशाची घडी मोडकळीस आणतात. अगदी स्वातंत्र्य मिळवतानाही भारताला हे सोसावे लागले. डिव्हाईड अँड रुल हेच तत्व इंग्रजांनी वापरून भारत आणि पाकिस्तान असे देशाचे दोन तुकडे केलेही. पण तरीही स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे आजही भारत या विविधतेत, भारतीयत्वाचा एक मौल्यवान घटक नक्कीच सांभाळून आहे. जेव्हा देशावर कुठलेही संकट, समस्या येते तेव्हा सारे भारतीय ही विभिन्नता विसरून एक झालेले आपण अनेकदा अनुभवलेले आहे.

थोडक्यात भारत देश हा एखाद्या सॅलड बाऊल सारखा आहे. प्रत्येकाचा वेगळेपणा शिल्लक ठेवायचा, राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय दृष्ट्या एकत्र वावरायचे आणि मोकळेपणाने देवाणघेवाण करायची .. देवाणघेवाणीत एकमेकांचे गुणधर्म घेतले तर ते गैर मानायचे नाहीत आणि वेगळेपणाही टिकवला तर त्यात वैषम्य मानायचे नाही. विविधतेत एकता हेच सूत्र… अशीच राजकीय व्यवस्था म्हणजेच एक सामाजिक सांस्कृतिक प्रकल्प निभावणे. हे आजही भारतीय लोकशाहीचे तत्व आहेच आहे. आणि म्हणूनच इतकी विविधता असूनही जगातला सर्वात श्रेष्ठ लोकशाही असलेला देश म्हणूनच भारताची गणना होते.
जय हिंद!!

राधिका भंडारकर अमेरिका

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − seven =