You are currently viewing पर्जन्यमान व उपाय …

पर्जन्यमान व उपाय …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*पर्जन्यमान व उपाय …*

१९८३ ला आम्ही गंगापूर रोड पंपिंगस्टेशनला
रहायला आलो. त्याआधी दहा वर्षे नुकत्याच
निर्माण झालेल्या शिवप्रताप कॅालनीत राहिलो. १९७३ ते १९८३ फार मोठा कालावधी होता तो. १९७८ ला पंपिंग स्टेशन
रोडला प्लॅाट घेतला तेव्हा आमचे घर ते गंगापूर
गाव प्रचंड झाडी होती. काही दिवस ८३ ला रहायला आल्यानंतर आम्ही २/३ मैत्रिणी पहाटे
फिरायला आनंदवल्ली पर्यंत जात असू. तसे ते
अंतर फार नाही पण ८३ ला ते खूप वाटे. कारण
तुरळक घरे व भरपूर वेगवेगळ्या प्रकारची वृक्षराजी, १००/१०० वर्षे जुनी असलेली ती वड
पिंपळ उंबर सागरगोट्या बिट्ट्या औषधी भली
मोठी दुधी भोपळ्या एवढी चिंच व खूप मोठी
आंब्याची कडेकडेने लावलेली झाडी, अशा झाडीतून पहाटे शुकशुकाट असतांना त्या निरव
शांततेत आभाळातून चंद्र दूध सांडत असे व
आकाशातून हलके हलके झिरपणाऱ्या धुक्यामुळे झाडांतून पाणी ठिबकून रस्ते ओलसर होत असलेले व मंद झुळकीमुळे हलकासा थंड शहारा अंगावरून जात असे. अशा आम्ही सुखदु:खाच्या गप्पा करत
घराकडे चालत जात असू ते दिवस आताही मला डोळ्यांसमोर जसेच्यातसे दिसत आहेत.
माझ्या घरासमोर प्रचंड जंगल होते, हजारो पक्षी होते आता तिथे मोठे इंग्लिश मेडियम स्कूल झाले आहे व आमचे घर व बाजूला फक्त एकच घर होते आता हजारो घरे इमारती
झाल्या आहेत.
गंगापूरच्या अलिकडे सोमेश्वर देवस्थान आहे.
आम्ही मुलांना पायी पायी घेऊन जातांना पायी
जात आहोत हे मुळीच जाणवत नसे कारण
दोन्ही बाजुच्या झाडांनी धरलेले सावलीचे छत्र
एवढे दाट होते की उन्हात भरदुपारी पायी पायी
फिरल्याचे फिलिंग न येता पोरं अगदी रमत गमत पळत चालत असत. आंब्याच्या दिवसात
लगडलेल्या त्या रस्त्यावर झुलणाऱ्या कैऱ्या पाहून मुलांबरोबर आम्हालाही तोडण्याचा मोह
आवरला नाही व एकदा आम्ही अडचणीत सापडलो होतो.

सांगायचा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल
जिकडे तिकडे रस्त्यावर प्रचंड झाडी होती. पाऊस व्यवस्थित भरपूर व वेळेवर पडत होता. आम्ही ८३ ला रहायला आलो तेव्हा नगरपालिकेचे पाणी तिसऱ्या मजल्यावर मोटर
व लावता चढत होते.८/८ दिवस झडी आम्ही नाशिकला अनुभवली आहे.

आता २०२४ ला, त्याच गंगापूर रस्त्यावर प्रचंड
मॅाल व २०/२० मजली इमारती उभ्या ठाकल्या
आहेत. झाडांची कत्तल झाली आहे. एकही जुने
औषधी झाड शिल्लक नाही. गंगापूरच्या पेरूच्या बागांमध्ये ३०/३० मजल्यात २/२ कोटीचे फ्लॅट उभे झाले आहेत. हिरव्यागार टमाटे व पेरूच्या बागांमध्ये कॅाक्रिटचे महाल
उभे झालेत. कसा पडणार हो पाऊस?आणि
लोकसंख्या ज्या रोडवर बंगल्यात हजार माणसे रहात तेथे आता ५०,००० हजार माणसे
रहातात, पाण्याची प्रचंड मागणी पुरी करता करता आता महापालिकेच्या नाकीनऊ येतात.
मग खोदा बोअरवेल. बांधकाम निघाले की ६०० ते ८०० फूट खोल मशिन जाते तरी पाणी
सापडत नाही मग आणखी खोल आणखी खोल त्या धरणीच्या पोटात मशिन घालून तिला कोरतात पण “ आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हो?” जमिनीतच पाणी
नाही, ती तरी बिचारी काय करील?

दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, शहरीकरण
या मुळे साऱ्याच समस्या वाढल्या आहेत, तरी
माणसाचे डोळे उघडत नाही याला काय म्हणावे?ह्या वर्षी गंगापूर धरण जेमतेम भरले.
नंतर नदीला पूरही आला नाही. आता व्यक्तिगत लेव्हलवर माणूस शहाणा होऊन
त्याने उपाय केले नाहीत तर …
फार गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.अगदी
ठरवून प्रत्येक माणसाने झाडे (झाड नव्हे) लावली पाहिजेत आणि ती स्वयंभू होईपर्यंत
जोपासली पाहिजेत. जंगलात बिया फेकून जंगले वाढली पाहिजेत. नाशिक मुंबई रस्त्यावर प्रचंड जंगल होते. पावसाळ्यात डोंगरातून पाणी दुधासारखे हजारो ठिकाणी
धावतांना दिसायचे ते सारे डोंगर फोडून रस्ते
केल्यामुळे झाडे व डोंगर यांचे प्रचंड नुकसान
झाले आहे. प्रपात गेले ओहोळ आटले.सौंदर्याची प्रचंड हानी झाली. आता तिथे उजाड माळ व कॅांक्रिटचे जंगल दिसते.
एवढ्या एवढ्या टिचभर फ्लॅट मधून कबुतरासारखी माणसे राहतांना दिसतात.

पाणी जपून वापरणे, पाण्याची बचत करणे
ते काटकसरीने वापरणे हा सुद्धा उत्तम उपाय आहे. पण..आमच्या डोक्यातच ते शिरत नाही.
मुंबई काय नाशिक काय किंवा खेड्यापाड्यात
काय पाण्याची प्रचंड नासाडी केली जाते. मोलकरीणींसह सारेच पाण्याचा प्रचंड अपव्यय करतात.सांगणाऱ्याला वेड्यात काढतात.माझ्या लहानपणी बारामहिने बऱ्यापैकी वाहणारी आमची कापडण्याची भात नदीच हरवली आहे पण
लोकांना त्याचीही खंत नाही हो.नदीतच चक्क
बांधकामे झाली आहेत.

आता जमेल तसे पाणी साठवणे, छतावरचे पावसाचे वाहून जाणारे
पाणी साठवून रीयूज करणे, कमीतकमी पाणी सांडून पाण्याचा अपव्यय कमी करणे व प्रचंड
प्रमाणात झाडे लावून वाढवून पावसाचे प्रमाण वाढवणे अशा अनेक अंगांनी लढलो तरच तरणोपाय आहे अन्यथा पाण्यासाठी युद्ध्ये
होण्याचे दिवस फार लांब नाहीत हे लक्षात
असू द्यावे.

जयहिंद जयमहाराष्ट्र…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा