You are currently viewing बकुळीची फुले

बकुळीची फुले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य, अध्यक्ष, कोमसाप सावंतवाडी तथा श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर दीपी लिखित “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाचे डॉ.मृदुला कुलकर्णी यांनी केलेलं पुस्तक परीक्षण*

 

*बकुळीची फुले* 

*लेखक – दीपक पटेकर (दीपी)*

श्री दीपक पटेकर सरांचा बकुळीची फुले हा वृत्तबद्ध कवितांचा संग्रह मिळाला आणि तो मी अगदी अधीरतेने वाचला. अतिशय छान अशा काव्यसरी अनुभवल्या.

चित्र पाहताच बकुळीचा गंध आठवणारे सुंदर मुखपृष्ठ आणि आदरणीय विजो सरांची प्रस्तावना लाभलेला हा संग्रह!

कवीने सुरुवातच स्वतःच्या गावाची ओळख करून दिली आहे. कोकणातल्या गावाचे सुरेख वर्णन केले आहे. पहाट, रंग उगवतीचे या रचना गावाकडची नयनरम्य सकाळ आपल्या डोळ्यासमोर उभी करतात.

 

दूर सारूनी आडोशाला दिनकर आला

सोनसळी त्या किरणांचा मग उत्सव झाला

किती सुरेख वर्णन आहे हे!

 

तर रखरखणाऱ्या उन्हातला बहावा कवीला हळदुली शाल ओढलेल्या नवरीसमान भासतो…किती छान कल्पना!

शाल हळदुली अंगावरची

भासे नवरी उभी अंगणी

डोईवरती पदर ओढुनी

वाट सख्याची पाहे सजणी

 

वृक्षवल्लीचे महत्त्व सांगताना, झाडांची सोबत असल्यावर जगतानाचा ताण जाणवत नाही हे कवी आवर्जून सांगतात

 

नसेल जागा तेथे गच्ची

लावा झाडे कुंड्यांमधुनी

हर्ष गवसतो महत्व कळते

जपण्याचेही श्वासांमधुनी

 

याबरोबरच ऋतू बरवा, ऋतू झरला, मनभावन श्रावण या कवितांमधून सृष्टीचे निरनिराळ्या ऋतूतले सौंदर्य अत्यंत बारकाईने वर्णन केले आहे. अवघा सृजन सोहळा अगदी वाचकांच्या समोर उभा केला आहे.

ही ओळच किती सुंदर कल्पना घेऊन येते बघा..

‘ मग धरणीवरती थेंब थेंब हे व्याले ‘

 

अवकाळी पावसामुळे होणाऱ्या परिणामांचे विदीर्ण चित्र वर्णन करताना त्यांनी पशु पक्षी फणसाचे झाड अशा सर्वांना बोलते केलेय…आणि शेवटी सर्वांनी ईश्वराला जाबही विचारला आहे..

पुण्यापेक्षा पाप कर्म ही करण्यासाठी अनेक तत्पर

तरी विठ्ठला सर्व पाहुनी शांत उभा का तूचि विटेवर..

 

सखे तुज पाहता, बहाणे, भेट यासारख्या तरल प्रेमकविता सहज गुणगुण करायला लावतात.

संसाराच्या वाटेवर पती पत्नी दोघेही समानच आहेत ते नाते तसेच मोहक राहिले तरच संसार बहरतो हे सांगताना ते म्हणतात,

संसाराचा लळा लागतो सखी सोबत असता

सहज जातसे तरुन नौका मन प्रेमाने भरता

तशीच संसाराचे मर्म सांगणारी ही दुसरी कविता…निरोप!

जपूनी नाती सून होऊन हळू रुळावे

हळद लागता नवरीने का नयन भरावे..खूप छान!

 

आठवणींचा कप्पा ही असेच हळवे करणारी कविता,

गतस्मृतींचा मग मनात मेळा भरला

ना कळे रिकामी कुठे कोपरा उरला

 

ते गाव मनीचे कधीच मागे सुटले

मन पक्षी झाले तिथे जावुनी बसले

 

जीवनसार,नश्वर जीवन, सोडून द्यावे यासारख्या कवितेतून अत्यंत मार्मिक भाष्य कवीने केले आहे.

मी मी म्हणून मी गर्व बाळगी

क्षणभंगुर हे आहे जीवन

क्षणात असतो क्षणात जातो

जीव कुणाचा नसतो पावन!

 

बाळ गोजिरा, लेक या कवितेतून गोड नात्यांचे, प्रेमाचे सुंदर वर्णन केले आहे

संस्कारांचे पैंजण पायी

चुकता पाऊल रुणझुणते

माय पित्याला दिधली वचने

क्षणात एका आठवते!

 

निसर्ग, प्रेम, नाते, राजकारण, सामाजिक आशय, ईश्वर,खाद्यप्रकार अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या अंगाने अधिकतर मात्रावृत्तात कवी दीपक पटेकर यांनी सहजतेने कविता केल्या आहेत. त्यातच एक सुनीत लिहून त्याही काव्यप्रकाराची झलक त्यांनी आपल्याला दाखवली आहे.

एकंदरीतच विषय वैविध्याने नटलेला हा काव्यसंग्रह वाचताना आपला बकुळीचा गंध वाचकांना भरभरून देतो हे नक्की!

 

डॉ मृदुला कुलकर्णी, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा