You are currently viewing संध्याकाळ

संध्याकाळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*संध्याकाळ*

सांजवेळ,संध्याकाळ,संधीकाल

म्हणजे मनाला काहीतरी हुरहुर लावणारी अशी ही वेळ,म्हणूनच ती कातरवेळ.

*या अशा कातरवेळी*

*पाहिजेस तू जवळी*

असे अगदी तरुण-तरुणींनाच नव्हे तर प्रौढावस्था पार करून गेलेल्या स्त्री-पुरुषांनाही नक्कीच वाटत असते. या वेळेला घरात एकटे राहणे ही कल्पनाच फार औदासिन्य निर्माण करणारी आहे.सूर्य अस्ताचली येतो, तेव्हा त्याचे प्रखर तेज नष्ट होऊन तो कसा अगदी सौम्य दिसतो.

आयुष्याची संध्याकाळ ही सुद्धा मावळतीला आलेल्या रवि- राजाप्रमाणेच आहे. बाल्यावस्थेतील अवखळपणा,तारुण्यातील जोश,या आयुष्याच्या सांजवेळी लुप्त पावलेला असतो.दोन-तीन दिवस तशीच ठेवलेली पालेभाजी जशी मरगळलेली दिसते तशीच मरगळ या वृद्धावस्थेत प्रत्येक स्त्री पुरुषाला आलेली असते. ही स्थिती अगदी नैसर्गिकच आहे.

जन्म आणि मरण हे कोणाच्याच हातात नाही.आयुष्याची दोरी जितकी लांब आहे तितके जगायचेच आहे,असे असताना मग रडत खडत का बरे जगावे? आजचा दिवस आपला आहे,आज आपण जगून घेऊ असा विचार जर कायम मनात ठेवला तर ही सांजवेळ उदासीन न भासता नवा हुरूप देणारी नक्कीच असेल यावर माझा ठाम विश्वास आहे.

वृद्धत्व आल्यानंतर आपण घरातील अडगळीतले सामान व्हायचे की आपले स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे हे सर्वतोपरी आपल्याच हातात आहे.

मुले मोठी झाली,चांगली शिकली सवरली,स्वतःच्या संसारात स्थित झाली म्हणजे त्यांचे आपल्यावरचे प्रेम,निष्ठा कमी झाली का? आज बहुतेक प्रत्येकच जेष्ठाला असेच वाटते.”आमच्या मुलांना आमच्याशी पाच मिनिटे बोलायलाही सवड नाही.” हा आवाज घराघरातून

ऐकू येत असतो.यावर मी असे म्हणेन की आपण जेष्ठांनीही त्यांची परिस्थिती समजावून घेणे आवश्यक आहे.

आजच्या पिढीचा मनावरचा ताण खूपच वाढला आहे.आजचा काळ हा अधिक स्पर्धेचा आहे आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या पिढीला अतोनात कष्ट घ्यावे लागतात.अशावेळी,माझा मुलगा माझ्याकडे लक्षच देत नाही,असे म्हणण्यापेक्षा आपणच त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरविला, कौतुकाचे दोन शब्द बोलले तर बिघडले कुठे?त्यालाही बरे वाटेल आणि आपले अस्तित्वही राहील.

मुलांच्या संसारात मुळीच ढवळाढवळ न करता, जर अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला, तर यशाचे माप तुमच्या पदरात कायम हे सर्वांनी लक्षात ठेवावे.प्रश्न असा आहे की ढवळाढवळ न करता राहायचे कसे?

उत्तर अगदी सोपे आहे.कुठेही स्वतःहून आपले मत द्यायचे नाही. मुले जेव्हा विचारतील तेव्हाच तोंड उघडावे.मान आपोआप मिळतो.

आता या उतार वयात मग करायचे तरी काय?तरुणपणी संसार सांभाळताना स्वतःसाठी करावयाच्या,स्वतःच्या आवडीच्या कितीतरी गोष्टी राहून गेलेल्या असतात.आता सेवानिवृत्तीनंतर स्वतःसाठी जगायचे,स्वतःचे छंद जोपासायचे.त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो खरोखरीच अद्वितीय आहे.

कितीतरी गोष्टी करता येतील. माझ्या परिचयाच्या एक बाई रोज नर्सिंग होम मध्ये जाऊन तेथील रुग्णांना चांगली चांगली पुस्तके, त्यातील विचार वाचून दाखवतात. त्या दुखणाईत स्त्री-पुरुषांना मनाची किती उभारी मिळते.

महिलामंडळांद्वारा पापड, लोणची वगैरे करून विकता येतात. गरजू महिलांना रोजगार मिळतो.

इथे मिशिगनमध्ये माझ्या माहितीत पाच-सहा ज्येष्ठ भगिनींचा एक समूह आहे.त्या सर्वजणी लोकरीचे विणकाम करतात.इथे सहा महिने कडाक्याची थंडी असल्यामुळे गरम कपड्यांचा वापर अत्यावश्यक आहे.या सहाजणी लोकरीचे स्वेटर्स, ब्लॅंकेट्स,स्कार्फ,टोप्या अशा विविध वस्तू विणून येथील शेल्टर होम मध्ये राहणाऱ्या गरीब लोकांना पुरवितात. समाजसेवाही होते आणि वेळ सत्कारणी लागून आपण टाकाऊ जिन्नस नसल्याची मनोमन खात्री पटते.

वयोपरत्वे प्रकृतीच्या काही बाही तक्रारी तर प्रत्येकाच्याच असणार. शरीर हे सुद्धा शेवटी एक यंत्रच आहे परंतु वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती पाहता आज कॅन्सर पेशंटही पूर्ण बरा होऊन काम करताना आपण पाहतो. तेव्हा शरीर साथ देईपर्यंत काम करणे सहज शक्य आहे नाही का?

अशी ही आयुष्याची सांजवेळ, आयुष्याची संध्याकाळ,म्हटली तर उदास नाहीतर उत्साहवर्धक!आता प्रत्येकाने स्वतंत्र विचार करून ठरवावे की आपण नक्की काय करायचे?

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा