You are currently viewing आयुष्याच्या वळणावर

आयुष्याच्या वळणावर

ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर (गोवा) लिखित अप्रतिम काव्यरचना

तो वृद्ध थकलेला….
उतारवयातल्या सांजवेळी
डोळ्यासमोर पल्याड किनारा खुणावताना…..
त्याला ती भेटली अशीच… अवचित
काठीचा आधार घेत.. टेकलेली बाकावर
हाश हुश झाल्यावर….
तो तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिला…. बराचवेळ अन्,
अरे!, ही तर सुमी…. एवढीशी होती
तेव्हा काय भांडायची…!
गल्लीच्या टोकाकडच घर….
पारावर भातुकली, गोटया खेळत…
मीच जिंकले म्हणत रडणारी…. नाही ती रडवणारीच तर काय…..!
सुमी…. अरे हीच तर ती सुमी….!
ती पण त्याला निरखत राहिलेली…
अरे हा तर गोप्या….. दोघंही स्तब्ध
निःशब्द डोळ्यातून पाझरणारे निःशब्द आसवांचे ओघ…
बरेच काही सांगून गेले एकमेकांना
त्या काही क्षणांच्या निकटतेत…..
बरीच वर्षे उलटून गेली भूतकाळातील…….!
आयुष्याची सैल झालेली, उसवलेली वीण आता….
कशीबशी निःशब्द टाक्याने, रफूने घट्ट होत चालली…..
त्याच्या समीप सरकत तिने आधाराला काठी घेतली
तोही तिला पहात…. ही होईल का आता तरी सोबतीण…. आयुष्याच्या सांजवेळी……?
आयुष्याच्या ह्या पल्याड वळणावर….?
प्रकृतीच्या तक्रारी सांगत… हातात हात गुंफून चालताना….
उद्याचं भविष्य उद्या बघू…..
आता तरी वर्तमान जगू…..
काय… करत दोघं निघाली….
त्या दोन थकलेल्या वृद्ध कायेवर
ग्रीष्मातही…. श्रावणाची शीतल सर बरसून गेली….!
सुखानंदाच्या वर्षावात दोन्ही काया
अंतरातून…. चिंब चिंब झालेल्या…..!!

मानसी जामसंडेकर
गोवा

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − six =