You are currently viewing मळगाव सुतारवाडी सर्कलवर भीषण अपघात; कार काजू स्टॉलमध्ये घुसली

मळगाव सुतारवाडी सर्कलवर भीषण अपघात; कार काजू स्टॉलमध्ये घुसली

मळगाव सुतारवाडी सर्कलवर भीषण अपघात; कार काजू स्टॉलमध्ये घुसली

दुचाकीस्वाराला वाचवताना नियंत्रण सुटले; तीन युवक जखमी, मोठा अनर्थ टळला

सावंतवाडी :

मुंबई–गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपास मार्गावर मळगाव सुतारवाडी सर्कल येथे रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार थेट रस्त्यालगतच्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसली. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन (मध्य प्रदेश) येथील चार युवक गोव्यात पर्यटनासाठी आले होते. हे सर्वजण मुंबईतील एका खाजगी कंपनीत कार्यरत असून होंडा अमेझ (MH 23 BH 8533 A) कारमधून गोव्याहून मुंबईकडे परतत होते. दुपारी मळगाव सुतारवाडी सर्कलजवळ पोहोचताच एक दुचाकीस्वार अचानक महामार्ग ओलांडू लागला. त्याला वाचवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक मारत कार वळवली. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम दुभाजकावर आदळली आणि उलट दिशेने फिरत काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये जाऊन जोरात धडकली.
हा स्टॉल मळगाव पिंपळवाडी येथील मंगेश राऊळ यांच्या मालकीचा आहे. अपघाताच्या वेळी ते जेवणासाठी घरी गेले असल्याने मोठा अनर्थ टळला. ते परत येत असतानाच त्यांच्या समोर हा प्रकार घडला. ते स्टॉलमध्ये असते तर जीवितहानी होण्याची शक्यता होती. या धडकेत स्टॉल व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातातील जखमी युवकांना तातडीने सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. सावंतवाडी पोलिसांनीही तात्काळ पंचनामा केला. मात्र, सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवली गेली नव्हती.
क्षणात घडलेली ही घटना मोठ्या दुर्घटनेत बदलली असती; सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी बेफिकीर वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा