भाजपा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या उपस्थितीत उद्घाटन
देशी गोपालन, सेंद्रिय शेती व पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा अभिनव उपक्रम
कणकवली :
फोंडाघाट – पावणादेवी येथे शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी दिवाकर विठ्ठल ठाकूर उर्फ राजा ठाकूर यांच्या निवासस्थानी “लक्ष्मीकांत गोशाळेचे” उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजा ठाकूर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर श्री गणेश पूजन व दीपप्रज्वलन माननीय प्रसन्ना देसाई आणि जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उपसरपंच तन्वी मोदी, शशिकांत ठाकूर, आदर्श शेतकरी महेश संसारे, किसान मोर्चाचे उमेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गोशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक शशिकांत ठाकूर गुरुजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, तर देशी गाईची पूजा प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजा ठाकूर यांच्या आयुष्याचा प्रवास, देशी गोपालनाचा निर्णय आणि गोसेवेचे महत्त्व यावर आधारित मनोगत सादर करण्यात आले.
भाषण करताना राजन चिके यांनी रासायनिक खतांच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त करत सेंद्रिय शेतीचा आग्रह धरला. प्रत्येकाने किमान एक देशी गाय पाळावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गोपालनासाठी आवश्यक मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
अध्यक्षीय भाषणात प्रसन्ना देसाई यांनी गोसेवेचे आध्यात्मिक व आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केले. तसेच गोशाळेत राबविण्यात येणाऱ्या उपचार पद्धतीला पर्यटनाशी जोडून रोजगारनिर्मिती साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी एमटीडीसीच्या माध्यमातून या उपक्रमाचे मार्केटिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात देशी गाईच्या शेण व गोमूत्रापासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
समारोप करताना राजा ठाकूर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत “विषमुक्त शेती – सेंद्रिय शेती” हा संदेश दिला. हा अभिनव उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरत असून कार्यक्रम उत्साहात पार पडला.
