You are currently viewing हत्ती व वन्यप्राण्यांच्या नुकसानीची भरपाई वाढणार; तिलारीत हत्ती अधिवासासाठी १२ कोटींची तरतूद

हत्ती व वन्यप्राण्यांच्या नुकसानीची भरपाई वाढणार; तिलारीत हत्ती अधिवासासाठी १२ कोटींची तरतूद

हत्ती व वन्यप्राण्यांच्या नुकसानीची भरपाई वाढणार; तिलारीत हत्ती अधिवासासाठी १२ कोटींची तरतूद

आजरा-घाटघर येथे ‘हत्ती ग्राम’साठी ९० कोटी; बांबू, फणस व काजूच्या नुकसानीलाही भरपाई देण्याचा निर्णय

सावंतवाडी

हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबरोबरच वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची सध्याची भरपाई वाढविण्याबाबत तत्त्वतः निर्णय घेण्यात आला आहे. बांबू, फणस व काजूच्या बोंडाच्या नुकसानीलाही भरपाईच्या कक्षेत आणण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज, १२ ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्ती व अन्य वन्यप्राण्यांचा उपद्रव, तिलारी राखीव वन्य क्षेत्र, दोडामार्ग तालुक्यातील वन्यजीव संवर्धन तसेच आरोंदा येथील कांदळवन प्रकल्पांबाबत बैठक झाली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, उपसभापती गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, गोपाळ गवस, राजन मोरये, गिरीष परब तसेच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आजरा-घाटघर येथे ‘हत्ती ग्राम’साठी ९० कोटी
आजरा-घाटघर येथे हत्तींसाठी स्वतंत्र ‘हत्ती ग्राम’ तयार करण्यासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून हत्तींच्या अधिवासाचा प्रश्न सोडविण्यासोबतच मानव-हत्ती संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
तिलारीत हत्तींच्या अधिवासासाठी १२ कोटी
तिलारी राखीव वन्य क्षेत्रात हत्तींसाठी आवश्यक खाद्य उपलब्ध करून देणे, संपूर्ण क्षेत्राला फेन्सिंग करणे आणि हत्तींचा सुरक्षित अधिवास विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींच्या उपद्रवावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना ट्रँक्विलायझरची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
झाडे, फळपिकांच्या नुकसानभरपाईत वाढ
वन्यप्राण्यांमुळे झाडे व फळपिकांचे होणारे नुकसान आणि त्यासाठी मिळणारी सध्याची भरपाई कमी असल्याने नुकसानभरपाईच्या रकमेत आवश्यक वाढ करण्याचा तत्त्वतः निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करून ही भरपाई वाढविण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना वनमंत्र्यांनी दिल्या.
बांबू, फणस व काजूच्या नुकसानीलाही भरपाई
वन विभागाच्या वर्गीकरणानुसार बांबूचा गवतामध्ये समावेश असल्याने त्याच्या नुकसानीस सध्या भरपाई मिळत नसल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. यावर बांबूचा वनस्पतीमध्ये समावेश करून त्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याच्या तत्त्वाला मान्यता देण्यात आली.
तसेच फळपिकांमध्ये फणस व काजूच्या बोंडाच्या नुकसानीसाठीही भरपाई मिळावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
वनक्षेत्रातील सर्पदंशाच्या मृत्यूस २५ लाखांची मदत
वनक्षेत्रात सर्पदंशामुळे जीवितहानी झाल्यास संबंधित कुटुंबाला हत्तीच्या हल्ल्यातील मदतीप्रमाणे २५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोडामार्गातील वन्यजीव संवर्धनाला गती
तिलारी धरणाच्या पाण्याच्या मागील भागातील जागा वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी अधिसूचित करण्यात आली आहे. या परिसरात आवश्यक कंपाउंड करणे, वन्यप्राण्यांचे स्थलांतर करणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित अधिवास निर्माण करण्याच्या कामांना नियोजनबद्ध पद्धतीने गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आरोंदा कांदळवन प्रकल्पही मार्गी लावण्याचे निर्देश
सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील कांदळवन बोर्डवॉक, इंटरप्रिटेशन सेंटर आणि कांदळवन पार्कसह संबंधित विकासकामे रखडली आहेत. या कामांचे आराखडे व आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया सुरू असून मंजूर निधीला मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे. ही कामे तातडीने मार्गी लावून स्थानिकांच्या अडीअडचणी दूर करण्याच्या स्पष्ट सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.
“लोकांच्या अडीअडचणी दूर झाल्या पाहिजेत आणि विकासकामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत,” अशी स्पष्ट भूमिका वनमंत्री नाईक यांनी बैठकीत मांडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा