सावंतवाडीत कृतीची नवी ओळख: ॲड. रुजूल पाटणकर यांनी स्वखर्चाने बुजवले रस्त्यांवरील खड्डे
सर्वोदय नगर–शिक्षक कॉलनी परिसरातील धोकादायक स्थितीवर उपाय; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
सावंतवाडी
केवळ समस्या मांडण्यापेक्षा त्यावर थेट उपाययोजना करण्याचा आदर्श सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते ॲड. रुजूल पाटणकर यांनी घालून दिला आहे. सर्वोदय नगर ते शिक्षक कॉलनी परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कोणाची वाट न पाहता त्यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचे काम केले.
या भागातील अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली होती. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली होती. ही बाब लक्षात घेऊन ॲड. पाटणकर यांनी तातडीने कृती करत रस्ते दुरुस्त केले. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले ॲड. पाटणकर यांनी यावेळीही सामाजिक बांधिलकी जपत काम केले. “समाजासाठी काहीतरी करण्याची भावना ठेवून हा छोटासा प्रयत्न केला. रस्त्यांवरील खड्डे अपघातांना कारणीभूत ठरतात, त्यामुळे हे काम आवश्यक होते,” असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे सर्वोदय नगर आणि शिक्षक कॉलनीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्थानिकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत असून, कृतीतून समाजासाठी उभे राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ॲड. रुजूल पाटणकर यांचे नाव पुढे येत आहे.
