You are currently viewing स्वार्थी सत्ता संघर्षात सत्ताधारी पक्षांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा विसर पडलाय..!

स्वार्थी सत्ता संघर्षात सत्ताधारी पक्षांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा विसर पडलाय..!

एकीकडे पाऊस लांबल्याने शेतकरी राजा हवालदिल दुसरीकडे सत्ताधारी पक्ष मात्र नौटंकीत व्यस्त.!

 

जनतेने आता राज ठाकरेंना आजमावून संधी देणे महाराष्ट्र हिताचे..प्रसाद गावडे

 

 

राज्यसभेच्या निवडणुकांपासून राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये टोकाचा सत्ता संघर्ष वाढीस लागला असून मागील तीन दिवसांपासून चालू असलेल्या शह काटशहाच्या नौटंकीत सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांचा सोयिस्कर विसर या राज्यकर्त्यांना पडलेला आहे.पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्या थांबल्या. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेलाच आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकटही ओढवलेलं आहे. पावसाच्या अनियमिततेचा प्रचंड फटका शेतीला बसणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर 10 वी व 12 वीच्या परिक्षानंतर मुलांच्या ऍडमिशन, त्यासाठी लागणारे दाखले. विद्यार्थी संख्या वाढल्याने शिक्षण संस्थांकडून घेतले जाणारे वारेमाप डोनेशन्स या सर्व चिंतेत पालकवर्ग आहे. उच्च व तांत्रिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी रोजगाराच्या संधी उपलबध होत नसल्याने चिंताग्रस्त आहेत. तर सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये कंत्राटी कर्मचारी भरती प्रणाली वाढीस लागल्याने कर्मचारी वर्ग देखील अहर्तेत आहे अशी काहीशी परिस्थिती असताना केंद्रातील भाजप व राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष सत्ता संघर्षांच्या राजकारणात व्यस्त असल्याने सर्वसामान्य जनता मात्र ह्यात भरडली जात आहे.

समाजातील दुःखी कष्टी जनतेचा विसर ह्या नादान राज्यकर्त्यांना पडलाय असेच चित्र आहे. या सगळ्या गलिच्छ राजकारणात राज्यातील जनतेला गृहीत धरले जात असून जनतेनेच आता त्यांना धडा शिकवण्याची खरी गरज आहे. स्वार्थापायी पक्ष निष्ठा, पक्षाची ध्येय धोरणे गहाण ठेवून राजकारण करणारे पक्ष हवेत की सर्व सामान्य जनतेला दैनंदिन भेडसावणारे प्रश्न आक्रमकपणे मांडून महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी झटणारे, अडचणीच्या प्रसंगी ठाम उभे राहणारे,स्व बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारे राज ठाकरे हवेत याचा गांभीर्याने विचार आता जनतेनेच करण्याची काळाची गरज असून तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे असे आवाहन मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा