You are currently viewing पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान तो जपलाचं पाहिजे – गिरीधर परांजपे.

पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान तो जपलाचं पाहिजे – गिरीधर परांजपे.

पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान तो जपलाचं पाहिजे – गिरीधर परांजपे.

-सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त जलप्रबोधन.

सावंतवाडी :

संपूर्ण ब्रह्मांडातील असंख्य ग्रह, तारे, नक्षत्रांपैकी फक्त पृथ्वीवरच पाणी आणि वनस्पती स्वरूपात सजीव सृष्टी आहे आणि म्हणूनच आपली पृथ्वी हे एक अनमोल रत्न आहे. पृथ्वीवरील या सजीव सृष्टीचे स्त्रोत पाणी अर्थातच जीवन आहे. जे तुमचे आमचे सर्वांचे जीवन म्हणून नावारूपास आहे. म्हणूनच पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असून पाणी संवर्धन आणि त्याचे जतन करणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य गिरीधर परांजपे यांनी सावंतवाडी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि सिंधुदुर्ग पाटबंधारे जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिनाचे औचित्य साधत सावंतवाडी येथील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ येथे जागतिक जलदिनानिमित्त ‘जलप्रबोधन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य गिरीधर परांजपे तसेच कार्यक्रमास विशेष उपस्थिती सिंधुदुर्ग पाटबंधारे व जलसंपदा विभाग यांचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आदी उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, डिजिटल मीडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गावकर, सुधाताई वामनराव कामत शाळेच्या मुख्याध्यापिका चैतताली गवस, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सावंत, माता पालक सभेच्या सौ. वीरनोडकर, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र देशपांडे, मंगल कामत, प्रा. रुपेश पाटील, जतीन भिसे, सौ. मंगल नाईक – जोशी, युवा पत्रकार भुवन नाईक, शाळेच्या शिक्षिका भक्ती फाले, पूजा ठाकूर, प्राची ढवळ, रीमा तोरसकर, सुप्रिया सावंत, रेश्मा शिरसाट, सहाय्यक शिक्षक विजय वसंत पाटील, अंगणवाडी सेविका सौ. अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर यांसह इतर पालक वर्ग उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग पाटबंधारे व जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात पाण्याचे असलेले महत्त्व सांगून कोकणातील जलसंपदा विभागातील विविध उपक्रम आणि जलसंपदा विभागाची कामगिरी स्पष्ट करून सांगितली. तसेच त्यांनी तिलारी प्रकल्पाबद्दल विशेष माहिती विशद केली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सेवानिवृत्त प्राचार्य गिरीधर परांजपे म्हणाले, पाणी हे आपले जीवन आहे. त्यामुळे पाणी जपून वापरले पाहिजे. पाण्यामुळेच आपल्या सजीव सृष्टीला महत्त्व प्राप्त होते. आगामी काळात तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठीच होईल, अशी भीती आहे. त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीसह मानव जातीच्या कल्याणासाठी या समस्येकडे आतापासूनच गांभीर्याने पाहिले पाहिजे. असे सांगून त्यांनी पाण्याच्या बचत करण्याच्या विविध प्रक्रिया सोदाहरण स्पष्ट केल्या.

यावेळी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर म्हणाले की, मानवी जीवन पाण्याशिवाय शक्य नाही. बालवयात जलसाक्षरतेचे असे धडे प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमधून दिले गेले तर नक्कीच विविध प्रश्न सोडविले जातील. असे सांगत त्यांनी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका चैताली गवस यांनी केले.

चौकट –
प्रेरणादायी बालगीते आणि जलसाक्षरतेच्या घोषणांनी शालेय परिसर दुमदुमला –
जागतिक जलदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निवेदन करत असताना प्रा. रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रेरणादायी बालगीते शिकविले.
‘हम बच्चे हिंदुस्तान के, भारत मा की जान के,
सच्चे है डरना किसी का, चलते सीना तानके.!’, अशा पद्धतीच्या विविध प्रेरणादायी बालगीतांनी तसेच त्यांनी दिलेल्या विविध घोषणा जसे की – ‘जल है तो कल है!’, ‘बचत करू पाण्याची, काळजी घेऊ सृष्टीची.!’, ‘पाणी हेच अन्न, पाणी हेच जीवन.!,
‘पाणी आडवा पाणी मुरवा’, ‘पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण.!’ , ‘पाण्याचा थेंब थेंब वाचवूया, जन जीवन सुरक्षित बनवूया!’,
‘काय उपयोग पैशांचा,
काय उपयोग सोन्या-नाण्यांचा,
जर नसेल एकही थेंब पाण्याचा.!’,
अशा प्रकारे विविध नारे देत विद्यार्थ्यांनीही प्रा. रुपेश पाटील यांच्या हाकेला साथ देत शालेय परिसर दुमदुमून काढला.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधाताई कामत शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी त्यांना सहकार्य केले.

दरम्यान यावेळी अंगणवाडीमधील तीन वर्षांची बालके स्निग्धा प्रभू व चिराग विर्नोडकर यांनी यावेळी पाण्याचे महत्त्व आपल्या बोबड्या शैलीत सुंदर पद्धतीने कथन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा