You are currently viewing माझे pvk विवेचन. .

माझे pvk विवेचन. .

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूह प्रमुख ज्येष्ठ लेखक कवी पांडुरंग कुलकर्णी यांचा अप्रतिम लेख*

>>>>>> माझे pvk विवेचन. .>>>>>>>>>
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

आपण मंदिरात मशिदीत, चर्चमध्ये, गुरूद्वारा मध्ये जाता ? का बरे जाता ? कश्यासाठी जावे ?

काहीतरी नाणे वगैरे पेटीत टाकून सर्व काही मागण्यासाठी माणूस रांगेत ताटकळत तासनतास उभा राहतो. कोणीतरी शहान्या माणसने त्याला सांगितलेले असते, ” अरे देवाची अनन्यभावाने भक्ती कर त्याला सर्व समजते, मग काही मागण्याची व मंदिरात जावून त्याला साकडे घालण्याची काही एक गरज नाही” पण ते त्यास पटले तरच नवल. देव असो दानव असो की मानव असो. जे जे काही जिथून जिथून ओरबाडून घेण्यासारखे आहे ते ओरबाडून घेण्यातच आपण आपल्या जीवनाची सार्थकता, इतिकर्तव्यता समजतो. पण वेड्या, मागून घेतलेले किती पुरेल ? ओरबदलेले कितीसे पुरेल? नि त्यात समाधान लाभेल का ? तो विकृत आनंद असेल. प्रकृती कडून विकृती कडे जाण्यापेक्षा संस्कृती कडे जाणे, केंव्हाही चांगले. सत्संगात, स्वाध्यायात गेल्यावर कळते ‘अरे ज्याच्या दर्शनासाठी कृपेसाठी मी एवढा वेळ रांगेत उभा होतो तो प्रत्येकाच्या हृदयातच वस्तीला आहे!’
काही मागण्यासाठी तर मंदिरात अजिबातच जावू नये. त्या परमेश्वराने आपणाला अख्खा मानव जन्मच दिला आहे. तोही सर्व साधनासहित. ती साधने म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, मन…..इत्यादी इत्यादी.
यावर आता आपण जीवन जगायचे आहे. जीवनाची अख्खी कादंबरी आपण लिहायची आहे. त्या कादंबरीचीही दोन पाने त्यांनीच लिहून दिली आहेत. पहिले पान जन्म, शेवटचे पान मृत्यू. आता आपणाला कादंबरीची मधली पाने लिहायची आहेत. त्यासाठी लागणारी संवेदना, विवेक, कल्पकता, दृष्टीकोण इत्यादी बऱ्याच गोष्टी सोबत दिल्या आहेत. आणि आता तो आपल्यावर फक्त त्याची ममत्वाची दृष्टी ठेवू देवळात उभा आहे. आपण आपले काम आता करायचे आहे, त्याने त्याचे काम केलेले आहे.
मग त्याच्याकडे देवळात जाऊन परत परत भिकर्या सारखे का बरे पदर पसरायचे ? हा अडाणीपणाच ना ? देव मनातल्या मनात हसत असेल. कीव येत असेल आपली त्याला.
आपल्याला जे जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवदर्शन करावे .आनंद यात्रा खऱ्या अर्थाने तिथे सुरू होते. मंदिराच्या गाभाऱ्यात मन शांत प्रसन्न होते. मनात मग स्वाध्यायात श्रवण केलेल्या विचारांचे गुंजन आत्मचिंतन, मनन सुरू होते. हे मनन चिंतन म्हणजेच देवदर्शन. हाच देवाचा प्रसाद. तो प्रासादिकतेने ग्रहण करावा. हे म्हणजे देवाच्या साक्षीने आपणच आपणाला पाहायचे आहे. पारखायचे आहे.
हां, तुम्ही देवळात अवश्य जा. पण मागायला नव्हे तर कृतज्ञता व्यक्त करायला. जीवनाचां लेखाजोखा द्यायला जा. आपले हवे तर मनोगत व्यक्त करायला जा. पण काही मागायला जावू नका. तो एक प्रकारचा कृतघ्नपणा होईल. त्या भगवंतावर आपण केलेला प्रहार किंवा अविश्वास होईल. बघा, विचार करा. मला जे वाटते, ते मी अापणामध्ये वाटले. आपणास पटले आणि आपण पुढे वाटले तर आम्हास बरे वाटेल. हा प्रसाद पुढे वाटायला तुम्ही आम्ही मोकळे.. नाही पटले तर सोडून देण्याबद्दल घालतो मी आपणास साकडे.
🙏शुभम भवतू 🙏

आपलाच सेवक
*पांडुरंग कुलकर्णी*
🙏🙏🙏🙏🙏🙏
_______________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =