You are currently viewing वयात आलेली मुले मुली..

वयात आलेली मुले मुली..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*वयात आलेली मुले मुली…*

 

*पालकांच्याअपेक्षा…*

 

सर्वकाळ चर्चेत रहावा असा विषय आहे. तो भविष्यात ही

कायम चर्चेत राहील या विषयी ही शंका नाही…

 

या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे म्हणजे पालकांना

कमी वयात मुले (वयस्कर..विचारी)परिपक्व व्हावीत असे वाटते,

जे प्रॅक्टिकली कधीच शक्य नसते.१४ ते १८ वर्ष वयात मुले

अत्यंत एककल्ली, हटवादी, आपल्या मनानुसारच वागणारी

व आपण करतो तेच बरोबर, इतर लोक उगीच आपल्याला

त्रास देतात असे मानणारी असतात.ते फक्त स्वत:चेच ऐकतात.समोरच्याने काही म्हटले की उद्धटपणे बोलतात.

आकांडतांडव करतात. घरोघर हेच चालू असते.

 

पालक वैतागतात. इलाज नसतो. हवा असतो संयम जो

खूप पालकांकडे नसतो. ही मुलांची नाजुक अवस्था असते.

शारिरीक मानसिक बदल होत असतात. गोंधळलेली अवस्था

असते. धड काही समजत नाही, विचारू शकत नाही.अशा

वेळी पालकांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळायची असते.शांत राहून गोड बोलून चुचकारून समजावायचे असते.

 

पण पालकांच्या अपेक्षाच फार असतात व त्या लादण्याचा

ते प्रयत्न करतात जे साफ चूक असते.प्रत्येक व्यक्तिमत्व हे

स्वतंत्र असते. कोणीच कोणासारखे नसते व तशी अपेक्षा करणे चुकीचे असते. एवढेच मार्क कसे मिळाले? शेजारच्याला

जास्त मिळाले.अहो, आपलं पोटेन्शियल असेल तेवढेच मिळतील ना ? आणि सगळ्यांनी काय डॅा. इंजिनिअरच व्हायचे

असते काय ? कुठे कष्ट कमी पडतात कुठे बुद्धिमत्ता! पण आपण समजून न घेता आगपाखड करत राहतो. करियर साठी

मुलाचा कल कशात आहे हे विचारले कधी तुम्ही मुलांना? नाही मला पालकाला तो डॅा.व्हावासा वाटतो म्हणून त्याचे

आवडीचे विषय नसतांना त्याने अभ्यास करायचा? कसे लक्ष

लागेल त्याचे?

 

माझा लहान मुलगा १२ वी त असतांना त्याने भरपूर अभ्यास

केला तो त्याला वाटले म्हणून. आम्ही त्याला म्हणालो, जे

मिळतील ते, तू कष्ट केलेत हे खूप झाले. आपण एफ वाय

बी एस सी ला ॲडमिशन घेऊ. भरपूर स्कोप आहे, तू चिंता

करू नको. त्याला 96/. पडले, 1992 साली. आता तो नाशिक मधील उत्तम रेडिॲालॅाजिस्ट आहे. आज काल तर

अभ्यासक्रम भयंकर हार्ड आहेत. कधी कधी मुलं भरडली जात

आहेत का आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली असे ही वाटते.

समतोल कसा ठेवता येईल याचा पालकांनी जरूर विचार

करावा.मुलातले गुण व कल ओळखून प्रोत्साहन दिल्यास

मुले ऐकतात.हॅमरिंग केले तर बिथरतात. पालकांनी कोणत्याच

गोष्टीची घाई करू नये. आपल्याला घाईच फार असते हो!

पटकन अल्लाउद्दिनचा दरवाजा उघडावा असे आपल्याला वाटते. पण लक्षात ठेवा” सब्र का फल मिठा होता है”.

अवास्तव अपेक्षा ठेवू नये. त्याने नैराश्यच पदरी येते.”आमची

तर श्रद्धा आहे जे होते ते चांगल्यासाठी होते” अडचणी आल्या

पण मार्ग निघत गेला. अपेक्षे पेक्षा मोठे यश मिळत गेले.

 

जीवनात सर्वत्र सामंजस्य असेल तर कधीच प्रश्न येत नाही.

यात तुमच्या नशिबाचा व दैवाचाही वाटा असतोच. आपण

म्हणतो ना.. जे व्हायचे तेच होते.फक्त कष्टा शिवाय फळ

नसते हे लक्षात ठेवा.२४ नंतर मुले इतकी परिपक्व होतात की

आपलाच विश्वास बसत नाही.म्हणून म्हणते…

 

“ थांबा… पहा… चला…”

 

धन्यवाद ….

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि २२ जून २०२३

वेळ : दुपारी ३/४०

प्रतिक्रिया व्यक्त करा