You are currently viewing 10 वी, 12 वी निकालाच्या तारखा जाहीर

10 वी, 12 वी निकालाच्या तारखा जाहीर

10 वी, 12 वी निकालाच्या तारखा जाहीर

राज्यात इयत्ता १२ वीचा निकाल  १० जूनपर्यंत तर इयत्ता १० वीचा निकाल  २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे.

शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. पण जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याची माहिती बोर्डाकडून दिली आहे. परीक्षेतील शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर करण्याची प्रमाणिक प्रक्रिया आहे. पण यावेळी इयत्ता बारावीची परीक्षा पंधरा दिवस उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असं बोर्डानं म्हटलं आहे. तसंच बारावीचा निकाल लागल्याच्या १० दिवसांनंतर इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कोरोना परिस्थितीमुळे परीक्षा होऊ शकल्या नव्हता. तर यंदा दहावीच्या परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू झाल्या होत्या. तर ४ एप्रिल २०२२ रोजी संपल्या होत्या. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती.

दरम्यान, इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल वेळेवर लागतील असं आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील दिलं होतं. त्यामुळे आता शिक्षण बोर्डानंच निकालांची संभाव्य तारीख जाहीर केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांसमोर चिंता काहीशी मिटली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =