You are currently viewing देवबागच्या बंधाऱ्यासाठी खासदार निधीतून १ कोटीचा निधी देणार : केंद्रीय मंत्री नारायण राणे

देवबागच्या बंधाऱ्यासाठी खासदार निधीतून १ कोटीचा निधी देणार : केंद्रीय मंत्री नारायण राणे

कायमस्वरूपी बंधाऱ्यासाठी नवीन आराखडा, अंदाजपत्रक बनविण्याच्या सूचना

मालवण :

येत्या पावसाळ्यात समुद्री अतिक्रमणामुळे देवबाग गावाला धोका पोहचू नये यासाठी तातडीची उपाययोजना राबविण्यासाठी खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन केंद्रीय लघु, सूक्ष्म, मध्यम मंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिले.

वायरी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा येथे संस्कृती क्लस्टर तसेच पर्यटनाच्या दृष्टीने पायाभूत सुविधांसाठी क्लस्टर अशी दोन क्लस्टर येत्या काळात करण्यावर भर दिला जाईल असेही श्री. राणे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा दौर्‍यावर आलेल्या केंद्रीयमंत्री श्री. राणे यांनी आज सायंकाळी देवबाग येथे पर्यटन व मासेमारी या अनुषंगाने व्यावसायिक, मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवादाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा मोंडकर, अशोक तोडणकर, धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर, बाबा परब, गणेश कुशे, नादार तुळसकर, अवि सामंत, महेश मांजरेकर, दाजी सावजी, दीपक पाटकर, नमिता गावकर, राजू परुळेकर, आबा हडकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, रवींद्र खानविलकर यांच्यासह मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी, पर्यटन व्यावसायिक, मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नादार तुळसकर यांनी पावसाळ्यात समुद्री अतिक्रमणामुळे गावास धोका निर्माण होत असल्याने ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी बंधार्‍याचे काम मार्गी लावण्यात यावे अशी मागणी केली. राज्यातील शासकीय पूजेचा मान मिळालेल्या वायरी येथील मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी संस्कृतीचे क्लस्टर बनविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर याठिकाणी बंधाराकम रस्ता झाल्यास येथील पर्यटनाला वेगळी चालना मिळेल. किनारपट्टी भागातील मच्छीमारांची संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी रापण महोत्सव आयोजित केला गेल्यास येथील पर्यटनाला वेगळी दिशा मिळेल असे बाबा मोंडकर यांनी सांगितले. येथील पर्यटन व्यावसायिकांनी सध्या भारनियमनाचा मोठा फटका बसला आहे. त्यादृष्टीने आवश्यक प्रयत्न करावेत अशी मागणी रवींद्र खानविलकर यांनी केली.
श्री. राणे म्हणाले, १९९० साली देवबाग ग्रामस्थांना जेव्हा स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात आल्या. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपले लक्ष वेधल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून याठिकाणी बंधारा बांधून देवबाग गावचे संरक्षण करण्यात आले. मात्र गेल्या काही वर्षात सत्ताधार्‍यांकडून येथे अपेक्षित काम झालेले नाही. त्यामुळे तुम्ही कोणाला निवडून दिले याचा विचार करायला हवा. सद्यःस्थितीत पावसाळा जवळ आल्याने तातडीने ज्या उपाययोजना करता येतील त्या करण्यासाठी खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर नव्याने बंधारा बांधण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेत आराखडा व अंदाजपत्रक बनवून घेत हे कामही येत्या काळात मार्गी लावले जाईल अशी ग्वाही श्री. राणे यांनी दिली.
च्या दृष्टीने एक असे दोन क्लस्टर येत्या काळात येथे राबविण्यात येतील. मोरयाचा धोंडा येथील क्लस्टरसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून तो आपल्याकडे पाठवावा. हे काम निश्‍चितच मार्गी लावले जाईल असे श्री. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
चिपी विमानतळ, सी-वर्ल्डला विरोध करणारे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी विरोध केला. सी-वर्ल्डमध्ये तीन फाईव्हस्टार मंजूर होती. किती लोकांना नोकर्‍या मिळाल्या असत्या. आंबा, काजू अन्य फळे हॉटेलमधून घेतली गेली असती त्यातून मोठे ग्राहक मिळाले असते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पर्यटन हा व्यवसाय आहे. रोजीरोटी मिळवून देणारा हा व्यवसाय आहे त्याला विरोध केला. त्यामुळे खासदार, आमदारांना काही बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी लोकांशी नेहमी खोटे बोलावे आणि फसवणूक करावी हेच शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना माहिती आहे अशी टीका श्री. राणे यांनी केली.

मनसे व भाजप यांची येत्या काळात युती होणार असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, समुद्रात किती नद्या मिसळतात. त्यामुळे ते आले तर त्यांना घेणार. समुद्र कंडीशन घालत नाही. समुद्र मोठा आहे. जगात कोणत्या पक्षाचे सदस्य नाहीत तेवढे भाजपचे आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागायलाच हवी. कारण राज्यात सध्या कायदा, सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. हत्या, दरोडे किती वाढत आहे. विरोधकांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. त्यामुळे हे सरकार जायलाच पाहिजे आणि जे नवीन सरकार येईल त्याचे जनतेने स्वागत करावे असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + seventeen =