कुडाळ-मालवण तालुक्यातील खरीप हंगाम आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले ; शेतकऱ्यांच्या समस्या थेट ऐकून घेण्यावर भर
कुडाळ / प्रतिनिधी :
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. मात्र त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रकारे राबवल्या गेल्या नाहीत, तर त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतो आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्या योजना त्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा आमदार निलेश राणे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला.
कुडाळ येथे कुडाळ व मालवण तालुक्यातील कृषी विभागाच्या खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष सातविलकर, सभापती मिलिंद नाईक, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईकनवरे, विभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, अनिकेत कदम, कुडाळ तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले, मालवण तालुका कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण आदी उपस्थित होते.
या बैठकीत कुडाळ आणि मालवण तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी वर्षभरात विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांचा तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा सादर केला. यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या समस्या आणि नाराजीवर आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
ते म्हणाले, कृषी विभागाला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. कारण शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अधिकारी वर्ग हा कणा मोडण्याचे काम करत असल्याचे दिसून येते. शासनाच्या विविध योजना असूनही त्या शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचत नाहीत किंवा योग्य पद्धतीने राबवल्या जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान झाले तर पावसाळा असो वा हिवाळा, तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत. पंचनामे करण्यासाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही. कृषी विभागाकडे त्याचे अधिकार आहेत. मात्र यावर्षी काजू आणि आंबा बागायतदारांच्या अपेक्षेप्रमाणे काम झाले नसल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोपही त्यांनी केला.
“शेतकऱ्यांची आणि सभागृहाची दिशाभूल करू नका. तुमच्यात सुधारणा करा, अन्यथा महागात पडेल,” अशा शब्दांत आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. “अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. शासनाच्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,” असेही ते म्हणाले.
कुडाळ आणि मालवण तालुक्यात अनेक प्रगतशील शेतकरी असूनही ठराविक शेतकऱ्यांनाच पुरस्कार दिले जातात. इतर शेतकऱ्यांना डावलले जाते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या वर्षभरात खर्च झालेल्या निधीची क्षेत्रपत्रिका सादर करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर यांनी फार्मर आयडीचा प्रश्न उपस्थित केला. अनेक शेतकऱ्यांना अद्याप फार्मर आयडी मिळालेला नाही. फार्मर आयडी नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. यावर तहसीलदार सचिन पाटील यांनी फार्मर आयडी संदर्भातील प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी ‘गाव शिवार योजना’ किती गावांमध्ये राबविण्यात आली आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांना झाला, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कुडाळ तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले यांनी माहिती दिली.
तसेच शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे संकरित बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश साळगावकर यांनी केली. यावर आमदार निलेश राणे यांनी यावर्षी जिल्हा परिषदेमार्फत संकरित बियाणे वाटपाचे नियोजन केले जाईल, असे सांगितले.
या आढावा बैठकीत कुडाळ आणि मालवण तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, पूर्वी आढावा बैठका बंद खोलीत घेतल्या जात होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या कामकाजाची आणि योजनांची माहिती मिळत नव्हती. आता मात्र शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या जात आहेत, जेणेकरून अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या चुका थेट शेतकऱ्यांनाही समजू शकतील आणि त्यांचे प्रश्न तत्काळ मांडता येतील.
