सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी अरविंद मोंडकर यांची नियुक्ती
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने घोषणा; जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार
मालवण,
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियाना’ अंतर्गत देशभरातील विविध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुरा मालवण येथील खंबीर आणि अनुभवी नेते अरविंद मोंडकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
या संदर्भातील अधिकृत नियुक्ती पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीने त्यांना पाठविण्यात आले आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना अरविंद मोंडकर यांनी सांगितले की, देशातील लोकशाही आणि संविधान अधिक मजबूत करण्यासाठी तसेच गांधी-नेहरू यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेतृत्व, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांना सोबत घेऊन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमय करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अरविंद मोंडकर यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
