बेजबाबदार नगरपालिका……

सावंतवाडीत कोरोनाचे वाढते रुग्ण याला नगरपालिका प्रशासनाची ढिलाई कारणीभूत आहे. नगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवक अडकले आहेत आपापसातील वादात.. नगरसेवकांना तर सावंतवाडीतील जनतेशी काहीही देणंघेणं नसल्यासारखेच त्यांचे वर्तन आहे. काहीजण तर बाजारपेठेत… हा संशोधनाचा विषय आहे. सत्ताधारी असो वा विरोधक नगरपलिकेला वालीच नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत गुंतलेल्याना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी राहिली नाही.
जास्त रुग्ण दगावलेल्या वॉर्डात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून चार पाच दिवस झालेत, रुग्ण डिस्चार्ज व्हायला आला तरी नगरपालिका प्रशासनाने त्यांचे घर कंटेन्मेंट केलेलं नाही, किंवा त्यांच्या घरावर गेल्या पाच दिवसात कोणताही बोर्ड लावलेला नाही. त्यामुळे घरातील व्यक्ती बाजारपेठेत निर्धास्तपणे फिरतात. असे बेफिकीर वागल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या घरात जवळच्या व्यक्ती पॉझिटिव्ह येण्याची शक्यता जास्त असते. परंतु रिपोर्ट येण्यास उशीर होत असल्याने रुग्णांचे नातेवाईक बाजारपेठेत फिरत आहेत.
नगरपालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे सावंतवाडीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बाजारपेठ बंद करण्याची धडपड करणाऱ्यांनी स्वतःच्या वॉर्डात जरी घरोघर जाऊन झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाकडून कंटेन्मेंट झोन करणे, जंतुनाशक फवारणी करणे, घरातील कचरा वेगळा करतात की नाही याची माहिती घेणे ही कामे जरी केली तरी *नगरसेवक या शब्दाचं भाग्य उघडल्यासारखे होईल आणि त्या पदाला सुद्धा योग्य न्याय मिळेल*.
बाजारपेठेत मास्क शिवाय असणाऱ्यांवर कारवाई होईल, अशी घोषणा झालेली परंतु काही नागरिक मास्क शिवाय फिरतातच, परंतु बरेचसे व्यापारी मास्क व्यवस्थित लावत नाहीत, त्यांना एकदा दंड करून दुसऱ्या वेळी पुन्हा तसा प्रकार घडल्यास दुकान सात दिवस बंद ठेवण्याची नोटीस देण्याची कारवाई करावी आणि व्यापारी संघालाही तशा सूचना कराव्यात, अन्यथा असे व्यापारी कोरोना घेऊन घरी जातात आणि कोरोनाचा विळखा वाढतो.
नगरपलिकेतील जनतेच्या सेवकांनी नगरसेवक या शब्दाचा मान राखत खऱ्या अर्थाने नगराच्या सेवेत वाहून घ्यावे, तरच कोरोनाला आळा घालता येईल अन्यथा शहरात वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही. प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घेत पॉझिटिव्ह रुग्ण असणाऱ्या घरांवर कंटेन्मेंट झोन असल्याबाबत तात्काळ बोर्ड लावून घरातील व्यक्ती बाहेर, बाजारपेठेत आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल याबाबत समज द्यावी. तरच कोरोनविरुद्धचा लढा यशस्वी होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =